Bollywood Singer On Arijit Singh Retirement : २७ जानेवारी रोजी बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांसह असंख्य रसिक श्रोत्यांना धक्का बसला. कारण- ही पोस्ट होती त्याच्या पार्श्वगायनातील निवृत्तीची.

आपल्या सुमधुर गायनासाठी ओळखला जाणारा अरिजीत हा सर्वांत लोकप्रिय गायक आहे. रिअॅलिटी शोमधून आपला सांगीतिक प्रवास सुरू करत तो आज बॉलीवूडच्या सध्याच्या टॉप गायकांपैकी एक गायक बनला आहे; पण त्यानं अचानक निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे त्याचे असंख्य चाहते नाराज झाले आहेत.

अरिजीतच्या पार्श्वगायनातील निवृत्तीबद्दल संगीत क्षेत्रातील अनेकांनी त्यांची मतं व्यक्त केली असून, सर्वांनीच त्याच्या या निर्णयाला समर्थन दिलं आहे. अशातच गायक-संगीतकार विशाल ददलानीनेसुद्धा अरिजीतच्या पार्श्वगायनातील निवृत्तीबद्दल प्रतिक्रिया दिली. विशाल अरिजीतबद्दल नेमकं काय म्हणालाय, चला जाणून घेऊ…

आपल्यापैकी कोणी असो वा नसो…

Untriggered with AminJaz या पॉडकास्टमध्ये बोलताना विशाल म्हणाला की, तो अरिजीतच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतो आणि भविष्यात अरिजीत काय नवीन संगीत घेऊन येतोय ते ऐकण्यासाठी तो खूप उत्सुक आहे. विशाल म्हणाला, “अरिजीतनं त्याच्या या निर्णयाबद्दल काही कारणं सांगितली आहेत. शेवटी जे मनाला योग्य वाटतं, तेच करायला हवं. संगीत हे समुद्रासारखं आहे; आपल्यापैकी कोणी असो किंवा नसो, ते कायम राहणारच. अरिजीत संगीत क्षेत्रातला खूप मोठा कलाकार आहे, यात काहीच शंका नाही. आयुष्यात नवनवीन गोष्टी करून पाहणं महत्त्वाचं आहे.”

त्याला योग्य वाटतं ते त्यानं करावं…

पुढे पॉडकास्टच्या होस्टनं म्हटलं की अरिजीतनं स्वतंत्र संगीत तयार केलं तरी तेही छान असेल. त्यावर विशाल म्हणाला, “ते संगीत ऐकल्यावरच त्याबद्दल मत देता येईल. त्याच्या पुढच्या संगीताबद्दल आतापासूनच अंदाज बांधणं मला योग्य वाटत नाही. पण एक गोष्ट नक्की… मी कायम त्याच्या बाजूनं आहे. त्याला जे करायचं आहे ते त्यानं नक्की करावं. मला तो खूप आवडतो. तो खूप चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे आणि त्याचं संगीत तर उत्तमच आहे. त्यामुळे त्याला जे योग्य वाटतं ते त्यानं करावं.”

निवृत्तीनंतरचं पहिलं गाणं रिलीज

पार्श्वगायनातून निवृत्ती जाहीर केल्यानंतर अरिजीतनं स्वत:चं स्वतंत्र संगीत तयार करणार असल्याचं म्हटलं होतं. अशातच काही दिवसांपूर्वी अरिजीतचं पहिलं स्वतंत्र गाणंसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘रैना’ असं या गाण्याचं नाव असून, Garuudaa Music या यूट्यूब चॅनेलवर ह गाणं रिलीज झालं आहे. या गाण्याला विशाल-शेखर या जोडीपैकी संगीतकार शेखर रावजियानं संगीत दिलं असून अरिजीतनं हे गाणं गायलं आहे; तर प्रिया सरैया यांनी गीतलेखन केले आहे.

पोस्टद्वारे केली निवृत्तीची घोषणा

दरम्यान, अरिजीतनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पार्श्वगायनातील निवृत्तीची घोषणा केली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मागील अनेक वर्षांत मला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद! मला सांगताना आनंद होत आहे की, आता मी पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन कामं स्वीकारणार नाही. मी हा प्रवास संपवत आहे. हा एक अदभुत प्रवास होता.”