Bollywood Actor Net Worth : प्रसिद्धी किंवा लोकप्रियतेचा अनेकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो, तर काहींना अचानक मिळालेली प्रसिद्धी आणि लोकप्रियता झेपत नाही; त्यामुळे अनेकदा ते व्यसनाच्या आहारीसुद्धा जातात. बॉलीवूडचा असाच एक अभिनेता आहे, ज्याचे एका चित्रपटातील कामाचे खूप कौतुक झाले, पण याचा परिणाम त्याच्या खासगी आयुष्यावर झाला. कोण आहे हा अभिनेता? चला जाणून घेऊ…

आपण बोलत आहोत अभिनेता अभय देओलबद्दल, ज्याला आजही त्याच्या ‘देव डी’ या चित्रपटासाठी ओळखले जाते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आणि प्रेक्षकांची मनेही जिंकली. मात्र, याच चित्रपटामुळे अभयला वैयक्तिक आयुष्यात दारूचे व्यसन लागले होते.

अभयने इम्तियाज अलीच्या ‘सोचा न था’ या चित्रपटातून पदार्पण केले आणि त्यानंतर तो ‘ओए लक्की! लक्की ओए!’ मध्ये दिसला. मात्र, त्याला खरी ओळख अनुराग कश्यपच्या ‘देव डी’मुळे मिळाली. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले, पण त्याचा परिणाम त्याच्या खासगी आयुष्यावरही झाला. अभयने स्वतः मान्य केले होते की तो खऱ्या आयुष्यातही ‘देव डी’मधील त्याच्या भूमिकेसारखे वागू लागला होता.

एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, तो भूमिकेतून बाहेर पडू न शकल्यामुळे पूर्णपणे नशेत बुडालेला असायचा. त्याने सलग एक वर्ष दारू प्यायली आणि अनेक ठिकाणी फिरला. आज त्या काळातील मोजक्याच गोष्टी त्याला आठवतात.

अभय हा देओल या एका मोठ्या कुटुंबातून येतो, तरीही त्याला ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या झगमगाटात राहायला फारसे आवडत नाही. शालेय जीवनापासूनच नाटकात काम करून तो अभिनय क्षेत्रात आला. करिअर निवडताना त्याच्यासमोर अभिनय, चित्रकला, तत्त्वज्ञान आणि पत्रकारिता असे अनेक पर्याय होते, पण त्याने अभिनयाची वाट निवडली. खूप कमी लोकांना माहिती आहे की, अभयच्या वडिलांनीही अभिनयात नशीब आजमावले होते, पण त्यांना त्यांचे धाकटे भाऊ धर्मेंद्र यांच्यासारखे यश मिळाले नाही.

देओल कुटुंबातल्या सनी आणि बॉबी देओल यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तसंच या चित्रपटांतून त्यांनी चांगली कमाईसुद्धा केली. मात्र, याच कुटुंबातील अभय देओलने नेहमीच ग्लॅमरपासून दूर राहत वेगळ्या धाटणीचे अर्थपूर्ण चित्रपट निवडले. विशेष म्हणजे, सध्या असे म्हटले जाते की अभय हा देओल कुटुंबातील सर्वात श्रीमंत सदस्य आहे. ही श्रीमंती केवळ चित्रपटांमुळे नाही, तर त्याचे बिझनेस, गुंतवणूक आणि मालमत्तेमुळे (प्रॉपर्टी) आहे.

अभय देओलची एकूण संपत्ती आहे…

अभय देओलची कमाई त्याचे चुलत भाऊ सनी आणि बॉबी देओल यांच्यापेक्षाही जास्त असल्याचे सांगितले जाते. ‘लाइफस्टाइल एशिया’ आणि ‘मीडियम’च्या रिपोर्टनुसार, अभय देओलची एकूण संपत्ती ४०० कोटी रुपये आहे. अभय दरवर्षी सुमारे १० कोटी रुपये कमावतो. सध्या तो मोठ्या बजेटचे चित्रपट करत नसला, तरी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि निवडक भूमिकांमुळे त्याची कमाई स्थिर आहे.

बिझनेस आणि आलिशान घर

अभय देओलच्या संपत्तीचा मोठा हिस्सा त्याच्या व्यवसायातून येतो. त्याने करिअरच्या सुरुवातीलाच ‘द फॅटी काऊ’ (The Fatty Cow) नावाचे रेस्टॉरंट सुरू केले होते, जे खूप यशस्वी ठरले. याशिवाय त्याची ‘फॉर्बिडन फिल्म्स’ (Forbidden Films) नावाची स्वतःची प्रोडक्शन कंपनीदेखील आहे. मुंबईत त्याचे सुमारे १२७ कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. मुंबई आणि पंजाबमध्ये त्याच्या अनेक जमिनी आहेत. शिवाय गोव्यात त्याचे एक अतिशय सुंदर ‘इको-फ्रेंडली ग्लास हाऊस’देखील आहे.

अभय देओलच्या कामाच्या बाबतीत सांगायचे, तर अलीकडेच तो ‘बन टिक्की’ आणि नेटफ्लिक्सच्या ‘ट्रायल बाय फायर’ या सीरिजमध्ये दिसला होता. या दोन्ही कामांसाठी त्याचे प्रचंड कौतुक झाले आहे.