Akshay Kumar On VFX & AI In Action Movies : बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या स्टाईल आणि चित्रपटांसाठी, तसेच त्याच्या स्टंट सीनसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. अभिनेता चित्रपटातील स्टंट्स स्वत:च करतो. मात्र, अलीकडे चित्रपटात अॅक्शन सीनसाठी व्हीएफएक्स आणि एआयचा वापर केला जातो. यावर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. पडद्यावर आता पुन्हा वास्तववादी अॅक्शन चित्रपट यावेत अशी इच्छा त्याने व्यक्त केली आहे
सध्या इंडस्ट्रीत स्टंटसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे व्हीएफएक्स (VFX) आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान अक्षयला आवडत नाही. अक्षयने एका मुलाखतीत स्पष्ट केले की, त्याला संगणकावर तयार केलेल्या इफेक्ट्सवर आधारित स्टंट्सपेक्षा स्वतः प्रत्यक्ष जीवघेणे स्टंट करायला जास्त आवडतं.
करिअरच्या सुरुवातीला ‘खिलाडी’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अक्षयने ‘मोहरा’, ‘सुहाग’, ‘एलान’ आणि ‘जानवर’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांतून आपली ओळख निर्माण केली होती. अलीकडच्या काळात त्याने ‘हॉलिडे’, ‘गब्बर इज बॅक’ आणि ‘सूर्यवंशी’ यांसारख्या अॅक्शनपटांमध्ये काम केले असले, तरी आताच्या आणि पूर्वीच्या अॅक्शनमध्ये मोठा फरक असल्याचे त्याचे मत आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला, “आजकाल अॅक्शनमध्ये सगळं काही व्हीएफएक्सच्या मदतीने केले जाते, जे पाहताना खोटे वाटते. मला असा चित्रपट बनवायचा आहे ज्यात अॅक्शन खरी असेल.”
“जर मी उडी मारत असेन किंवा कोणाला लाथ मारत असेन, तर ती खरी असायला हवी, कोणाच्या मदतीने किंवा तंत्रज्ञानाने केलेली नको. एआयच्या या युगात लोकांना माझे विचार वेगळे वाटू शकतात, पण प्रेक्षकांना कलाकाराची मेहनत प्रत्यक्ष जाणवायला हवी”, असंही त्याने सांगितलं. पुढे एक उदाहरण देत तो म्हणाला, “हाताने काढलेले चित्र आणि डिजिटल प्रिंट यात जो फरक असतो, तोच फरक खऱ्या अॅक्शन आणि व्हीएफएक्समध्ये असतो. हाताने काढलेल्या चित्रात काही त्रुटी असल्या तरी त्यात जिवंतपणा असतो आणि मला चित्रपटांतून हाच जिवंतपणा दाखवायचा आहे.”
दरम्यान, गेल्या दशकात अक्षय कुमारच्या करिअरमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. त्याने केवळ अॅक्शनवर लक्ष केंद्रित न करता कॉमेडी आणि देशभक्तीपर चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. ‘हाउसफुल’ चित्रपटांची सीरिज, ‘भूल भुलैया’ आणि ‘गुड न्यूज’ यांसारख्या विनोदी चित्रपटांबरोबरच ‘एअरलिफ्ट’, ‘बेबी’, ‘केसरी’, ‘मिशन मंगल’ आणि ‘स्काय फोर्स’ यांसारख्या चित्रपटांतून त्याने देशप्रेम आणि शौर्याच्या कथा प्रेक्षकांसमोर आणल्या.
सध्या अक्षय त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यग्र आहे. तो रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल ५’ मध्ये अजय देवगण, अर्शद वारसी आणि तुषार कपूर यांच्याबरोबर दिसणार आहे. तसेच, प्रियदर्शन दिग्दर्शित त्याचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.
