Akshay Kumar Talk About Son Aarav’s Career : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘खिलाडी’, ‘मोहरा’, ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’, ‘भुलभुलैया’, ‘स्पेशल २६’, ‘बेबी’, ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’, ‘मिशन मंगल’ यांसह अनेक चित्रपटांमधून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेत्याची पत्नी आणि लेखिका ट्विंकल खन्ना हीदेखील लोकप्रिय अभिनेत्री होती. सध्या ती इंडस्ट्रीपासून लांब आहे.
मात्र, अक्षय अन् ट्विंकल यांचा मुलगा आरव चित्रपटसृष्टीत सक्रीय नाहीय. त्याला या क्षेत्रात काही रस नसून तो एका वेगळ्या क्षेत्रात आपलं करिअर करत आहे. याबद्दल अक्षयने स्वत:च नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. अक्षयचा मुलगा नक्की काय काम करतो, चला जाणून घेऊ…
आरवचा इंडस्ट्रीत यायचा विचार नाही
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्याने सांगितले की, मुलगा स्वभावाने त्याच्यासारखाच आहे. अक्षय म्हणाला, “आमच्या दोघांमध्ये खूप साम्य आहे. त्यालाही माझ्याप्रमाणेच फिट राहण्याची आवड आहे. तो खूप मेहनती मुलगा आहे. त्याची या इंडस्ट्रीत यायची अजिबात इच्छा नाही. त्याचा तसा कोणताही विचार सध्या तरी नाही. त्याला फॅशन इंडस्ट्रीत आपले नाव कमवायचे आहे.”
आरव सध्या फॅशनचे बारकावे शिकत असल्याचे अक्षयने सांगितले. तो म्हणाला, “आरव आजही ४,५०० रुपयांची नोकरी करत आहे. ही चांगलीच गोष्ट आहे. तो सध्या गावागावांत फिरून तिथली फॅशन, विविध प्रकारचे प्रिंट्स आणि डिझाईन्सचा अभ्यास करत आहे. मी त्याला जास्त उपदेश करत नाही. पण कोणाचेही नुकसान करू नकोस एवढेच त्याला सांगितले आहे.”
अक्षय कुमारचा मुलगा आरवबद्दल…
दरम्यान, आरव अक्षय आणि ट्विंकलचे पहिले अपत्य आहे. वयाच्या १५ व्या वर्षी तो उच्च शिक्षणासाठी परदेशात गेला असून सध्या लंडनच्या एका नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याची धाकटी बहीण नितारा अनेकदा ट्विंकलच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये दिसते. मात्र, आरवला प्रसिद्धीपासून दूर राहणे आणि साधेपणाने आयुष्य जगणे अधिक आवडते.
अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रियदर्शन यांच्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटात परेश रावल, तब्बू, वामिका गब्बी आणि राजपाल यादव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय आणि प्रियदर्शन यांची जोडी पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अक्षय कुमारच्या आगामी कामाबद्दल…
अक्षयचा आगामी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ हा आहे. हा चित्रपट २६ जून २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, अक्षय आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला आणि प्रियदर्शन दिग्दर्शित ‘हैवान’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
