Anil Kapoor Workout Video :अनिल कपूर हे बॉलीवूडमधील सर्वांत फिट अभिनेत्यांपैकी एक आहेत. ६९ वर्षांच्या वयातही ते नव्या पिढीच्या कलाकारांना फिटनेसच्या बाबतीत टक्कर देतात. वयाची साठी ओलांडूनही ते एका तिशीतल्या तरुणासारखेच दिसतात आणि त्यांची फिटनेस तर भल्याभल्यांना लाजवेल, अशी आहे.

अनिल कपूर यांच्या या फिटनेसमागे आहे ती त्यांची मेहनत आणि सातत्य. नुकताच त्यांनी त्यांचा जिममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून त्यांनी व्यायामातल्या सातत्याचं महत्त्वदेखील सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये अनिल कपूर शरीराच्या वरच्या भागासाठी (Upper Body) स्ट्रेंथ ट्रेनिंग घेत आहेत. तसेच ते डंबल शोल्डर प्रेस, हॅमर कर्ल्स, चेस्ट प्रेस, सीटेड रोइंग व लॅट पुल-डाऊन यांसारखे व्यायाम करतानाही व्हिडीओत दिसत आहेत. व्यायामानंतर शरीराला आराम मिळावा म्हणून त्यांनी ‘आईस बाथ’ (Ice Bath)देखील घेतल्याचे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

Award Banner

आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी ‘सातत्य’ किती महत्त्वाचे आहे, हे त्यांनी या व्हिडीओद्वारे पटवून दिले आहे. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी रोजच्या दिनचर्येत शिस्त असणे हाच सर्वांत प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले आहे. व्यायाम करत असतानाच त्यांनी आपल्या चाहत्यांना आरोग्याचा मंत्रदेखील दिला आहे.

व्यायामासाठी सातत्य महत्त्वाचं – अनिल कपूर

व्यायाम करत असतानाच अनिल कपूर या व्हिडीओमध्ये असं म्हणतात, “आयुष्यातील सर्वांत शक्तिशाली गोष्टींपैकी एक म्हणजे सातत्य. कोणतीही गोष्ट वारंवार आणि पुन्हा पुन्हा करण्याची क्षमताच तुम्हाला मोठं यश मिळवून देते. उत्तम शरीरयष्टी कमवायची असो किंवा एखादा व्यवसाय उभारायचा असो, रोजच्या छोट्या यशातूनच मोठा बदल घडतो. थोडक्यात सांगायचे तर, रोजच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे बदल म्हणजेच सातत्य होय.”

अन्न हे फक्त चवीसाठी नसतं – अनिल कपूर

अनिल कपूर यांच्या फिटनेससाठी आहाराही तितकाच महत्त्वाचा आहे. २०२२ मध्ये शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये अनिल कपूर यांनी सांगितलं होतं की, वर्कआऊटपेक्षा आपण काय खातो याला जास्त महत्त्व आहे. “अन्न हे फक्त चवीसाठी नसतं, तर शरीराची ताकद आणि सहनशक्ती वाढवण्यासाठीदेखील असतं. शरीर आणि मन दोन्ही मजबूत राहावं यासाठी आवश्यक तेवढंच आणि योग्य अन्न घेणं गरजेचं आहे,” असं ते म्हणाले होते.

अनिल कपूर यांनी शेअर केलेला व्हिडीओ

दरम्यान, अनिल कपूर हे नुकतेच दुसऱ्यांदा आजोबा झाले. त्यांची मुलगी सोनम कपूरने नुकताच बाळाला जन्म दिला. आजोबा झाल्यानंतर अनिल कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भावना व्यक्त केल्या. “बघता बघता माझं हृदय प्रेमानं अजूनच भरून आलं आहे. माझ्या बाळा, या जगात तुझं स्वागत आहे. तुझ्यावर आतापासूनच आम्हा सर्वांचं खूप प्रेम आहे. सोनम आणि आनंद, तुमचे खूप खूप आभार. नानाचं हृदय आज आनंदानं भरून गेलं आहे. बाळा, या सुंदर जगात तुझं स्वागत आहे.”