scorecardresearch

“केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड…” ‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया चर्चेत

चित्रपटातील ‘बेशरम’ गाण्यावरून बराच गदारोळ झाला. हे प्रकरण आता सेन्सॉर बोर्डाकडे गेले आहे

“केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्ड…” ‘पठाण’ चित्रपटाच्या वादावर अर्जुन कपूरची प्रतिक्रिया चर्चेत
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खान विविध कारणांनी चर्चेत येत असतो. सध्या त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची हवा आहे. त्याचा हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर ट्रेलर १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम’ गाण्यावरून बराच गदारोळ झाला. हे प्रकरण आता सेन्सॉर बोर्डाकडे गेले आहे, याच प्रकरणावर आता अर्जुन कपूरने भाष्य केलं आहे.

अर्जुन कपूर सोशल मीडियावर सक्रीय असतो, बॉलिवूडच्या घडामोडींवर तो भाष्य करताना दिसतो. नुकतीच त्याने ‘पठाण’ चित्रपटाच्याबाबतीत इंडिया टुडेला आपली प्रतिक्रिया दिली आहे, ज्यात तो म्हणाला, “आपण ज्यावर चर्चा करत आहोत त्याचा नक्की फायदा होईल. आपण सेन्सॉर बोर्ड आणि केंद्र सरकार वर विश्वास ठेवायला हवा ते दोघे एकत्र काम करतात. मला वाटते की लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, पण कलाकार म्हणून चित्रपटाला जे हवे आहे ते आपण केले पाहिजे आणि जे सत्य आहे ते धरून ठेवायला पाहिजे. अवास्तव प्रश्नांमध्ये आपण अडकायला नको.”

Pathan Trailer : ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहरुखबरोबर दिसणार सलमान खान? निर्मात्यांनी लढवली ‘ही’ शक्कल

अर्जुन कपूर पुढे म्हणाला, “चित्रपटासाठी जे लागेल ते देणे हे आपले काम आहे त्यानंतर चित्रपट प्रेक्षकांवर सोडायचा, त्यानंतर ते ठरवतील की विरोध करायचा की नाही. मला वाटते की, आम्ही बऱ्याच काळापासून याचे पालन केले आहे. प्रत्येक चित्रपटाला एक प्रक्रिया पाळावी लागते, आमचा चित्रपटही त्याला अपवाद नाही. लोकशाहीमध्ये प्रक्रिया आणि नियमांवर विश्वास ठेवला पाहिजे.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान आसमान भारद्वाज दिग्दर्शित ‘कुत्ते’ चित्रपटात अर्जुन कपूर दिसणार आहे त्याबरोबरीने कोंकणा सेन शर्मा, नसीरुद्दीन शाह, कुमुद मिश्रा, राधिका मदन, शार्दुल भारद्वाज आणि तब्बू असणार आहेत. ‘कुत्ते’हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 19:51 IST

संबंधित बातम्या