Bollywood Actor On His Son’s Career : बॉलीवूडमधील अनेक कलाकारांची मुलं सध्या इंडस्ट्रीत अभिनेते वा अभिनेत्री म्हणून कार्यरत आहेत. पण काही कलाकारांच्या मुलांनी अभिनेते वा अभिनेत्री न बनता आपली वेगळी वाट निवडली आहे. यापैकीच एक अभिनेता म्हणजे अर्शद वारसी.

गेल्या काही वर्षांत अर्शदने सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूड सिनेमांबरोबरच ओटीटीवरील वेबसीरिजमधील विविध भूमिकांमधूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला आहे.

अर्शदने आपले वैयक्तिक आयुष्य नेहमीच खाजगी ठेवले आहे. तरीही, काही मुलाखतींमध्ये त्याने आपली मुले झेक वारसी आणि झीन झोई वारसी यांच्यासोबतच्या नात्यावरही प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अर्शदचा २१ वर्षांचा मुलगा झेक सध्या इंडस्ट्रीत येण्याचे प्रयत्न करत आहे. पण यासाठी तो अर्शदचा मुलगा म्हणून आपली ओळख सांगत नाही. तर स्वत: आपल्या पायावर उभं राहण्यासाठी मेहनत करत आहे. त्याने सिद्धार्थ आनंद आणि राजू हिराणींसारख्या दिग्गज दिग्दर्शकांकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तर अर्शदची १८ वर्षांची मुलगी झीन सध्या शिक्षण घेत आहे. तिलाही सिनेक्षेत्रात येण्यात रस आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत अर्शदने सांगितले की, त्याची दोन्ही मुले इंडस्ट्रीत येण्यासाठी उत्सुक आहेत. पण या क्षेत्रातील अनिश्चिततेची त्याला जाणीव आहे. तो म्हणाला, “माझ्या दोन्ही मुलांना अभिनय करायचा आहे. माझा मुलगा सध्या सिद्धार्थ आनंदला असिस्ट करत आहे आणि त्याने राजू हिराणींबरोबरही काम केले आहे. अर्थात, मला मुलांची काळजी वाटते. पण या क्षेत्रात काम करणे आता कठीण झाले आहे. १५० कोटी लोकसंख्येच्या या देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक यशस्वी कलाकार होतात.”

“इथे कोणाची मदत कामाला येत नाही, तुम्हाला स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करावा लागतो. मी एखाद्या दिग्दर्शकाला फोन करून माझ्या मुलांवर कोट्यवधी रुपये खर्च करायला सांगू शकत नाही. मी माझ्या मुलांसाठी कोणाकडे शिफारस करणार नाही”, असंही तो म्हणाला. तसेच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये अर्शदने अनेक प्रतिभावान कलाकार केवळ नशीब साथ देत नाही म्हणून मागे पडतात. वडील म्हणून मला याचीच भीती वाटत असल्याचे म्हटले होते.

स्वतःच्या यशाबद्दल बोलताना तो गंमतीने म्हणाला होता की, त्याने शून्यातून विश्व निर्माण केले असले तरी तो इतकाही मोठा सुपरस्टार नाही की त्याच्या मुलांवर त्याच्या यशाचे ओझे असेल. “शाहरुख खान किंवा हृतिक रोशन यांच्या मुलांवर त्यांच्या पालकांपेक्षा मोठे होण्याचे दडपण असते. माझ्या मुलांवर हे ओझे नाही. त्यांनी फक्त चांगले कलाकार व्हावे, हीच माझी इच्छा आहे”, असं मत त्याने व्यक्त केले होते.