He-Man of Bollywood Dharmendra Death : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं आहे. वयाशी संबंधित आजारांमुळे काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. या उपचारांना ते सकारात्मक प्रतिसाद देत असल्यानं त्यांना पुन्हा घरी आणलं गेलं होतं. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा पाहून चाहतेही खूश होते; पण अखेर आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानं बॉलीवूडचा ही-मॅन हरपला आहे.
धर्मेंद्र यांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीत अनेक बॉलीवूड सिनेमे केले. त्यांच्या अभिनयानं त्यांनी गेली सहा दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अशाच या हरहुन्नरी अभिनेत्यानं आज निरोप घेतला आहे. त्यांच्या जाण्यानं मनोरंजनसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे.
धर्मेंद्र यांच्या फिल्मी कारकिर्दीबद्दल सांगायचं झाल्यास, ‘फिल्मफेअर’ मॅगझिनच्या पहिल्या टॅलेंट हंट स्पर्धेचे ते विजेते ठरलेले. मग त्यांनी अर्जुन हिंगोरानी यांच्या ‘दिल भी तेरा हम भी तेरे’मधून अभिनय करिअरची सुरुवात केली. नंतर १९६१ मध्ये आलेल्या ‘शोला और शबनम’नंतर त्यांना चांगलीच ओळख मिळाली. त्यानंतर ते १९६२ मध्ये आलेल्या ‘अनपढ़’मध्ये दिसले. मग १९६३ मध्ये ‘बंदिनी’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. धर्मेंद्र यांच्या करिअरमध्ये हा एक महत्वाचा टप्पा ठरला.
पुढे ‘हकीकत’ हा सिनेमा धर्मेंद्र यांच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरला, जो १९६२ च्या भारत-चीन युद्धावर आधारित होता. हा चित्रपट खूप यशस्वी झाला आणि त्यातील गाणं ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयों’ अत्यंत लोकप्रिय झालं. नंतर धर्मेंद्र १९६६ मध्ये आलेल्या ‘फूल और पत्थर’मध्ये मुख्य भूमिकेत दिसले आणि या चित्रपटाने धर्मेंद्र यांना मोठं स्टार बनवलं.
अशी यशस्वी कारकीर्द करणारे बॉलीवूडचे ही-मॅन अखेरच्या श्वासापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करीत राहिले. श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘इक्कीस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट. ‘सत्यकाम’ आणि ‘अनुपमा’मधील त्यांच्या प्रेमळ व्यक्तिरेखांपासून, ते ‘शोले’, ‘हत्यार’, ‘जुगनू’सारख्या चित्रपटांतील त्यांच्या दमदार अभिनयापर्यंत… धर्मेंद्र यांनी प्रत्येक भूमिकांमधून आपली बहुआयामी प्रतिभा दाखवून दिली. अशाच या हरहुन्नरी अभिनेत्यानं आज या जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे.
