Govinda Clarification on Affair Allegations : गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी काही दिवसांपासून जोर धरला होता. यादरम्यान, गोविंदावर अफेअरचे आरोपही होत राहिले आहेत. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत गोविंदानं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सुनीता आहुजा यांनी काही दिवसांपूर्वीच्या एका मुलाखतीत कोमल, असं एक नाव घेतलं होतं. मला हे नाव आवडत नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. पत्नीनं घेतलेल्या याच कोमल नावाबद्दल गोविंदानं आता स्पष्टीकरण दिलं आहे.
एनआयशी बोलताना गोविंदा म्हणाला, “माझ्यावर कधी आरोप केले गेले नाहीत? सुरुवातीला तर अभिनेत्रींना हात लावतानासुद्धा माझे हात थरथरायचे. तेव्हाही माझ्यावर असे आरोप झाले आहेत. आता हे आरोप करणारी व्यक्ती माझं बालपणीचं प्रेम आहे. प्रेमाच्या बाबतीत माझं काही चाललंच नाही. तरुणपणीचं प्रेमसुद्धा मला सोडून गेलं. आता ज्यांना वाटतंय की, मी प्रेमात आहे. ते माझं म्हातारपणीचं प्रेम आहे.”
पुढे तो म्हणाला, “मी चार-चार सुपरस्टार आणि मिस युनिव्हर्स असलेल्या अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. मी त्यांच्याकडे कधी पाहिलं नाही. एकाही हिरोईनला मी त्रास दिलाय, असं म्हणू शकत नाही. तर, जी हिरोईन माझ्या घरात येत आहे आणि माझ्या प्रॉडक्शनमधून तिच्या करिअरची सुरुवात करत आहे, तिच्याबद्दल मी कधीच चुकीचा विचार करू शकत नाही. ज्या ज्या चित्रपटांमधून मला लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळालीय, त्यात माझ्यासह दिग्दर्शक, गाणी आणि अभिनेत्रींचा जास्त वाटा आहे. माझी आईसुद्धा अभिनेत्री होती. मी कधीच कुठल्या अभिनेत्रीबरोबर गैरवर्तन करणार नाही. पत्नीनं केलेल्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो. ज्या नवोदित अभिनेत्रींबरोबर मला काम करायची इच्छा आहे; पण अशा चर्चांमुळे त्या घाबरू नयेत आणि माझ्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी नकार देऊ नये म्हणजे झालं.”
पुढे गोविंदानं सुनीतानं कोमल या व्यक्तीबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्तर देत सांगितले, “जिचं नाव घेतलं जात आहे ती कोमल… मी तिला धन्यवाद देतो. कारण- तिनं यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिच्यामुळे मी वाचलो आहे, ती एकही शब्द माझ्याविरोधात बोलत नाही. ती शांत आहे. अशा प्रकारे बातम्यांमध्ये नाव येऊनही तिनं काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. कारण- ती अशा पद्धतीनं प्रसिद्धी मिळवू इच्छित नाही.”

