Govinda Gunshot Incident : २०२४ मध्ये बॉलीवूड अभिनेता गोविंदाला गोळी लागली होती. गोविंदाच्या स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्तुलामधून गोळी झाडली गेल्यानंतर झालेल्या अपघातात अभिनेता जखमी झाला होता. त्या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यादरम्यान गोविंदानं फिजिओथेरपीही घेतली होती. अशातच त्यांची फिजिओथेरपिस्ट डॉ. सुरभी धनवाला यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल आणि त्या काळात गोविंदा ज्या वैयक्तिक अडचणींना सामोरे जात होता, त्याबद्दल माहिती दिली आहे.
Galatta India शी बोलताना डॉ. सुरभी म्हणाल्या, “गोविंदा यांच्या पायाला चुकून गोळी लागली होती. त्याचदरम्यान मी त्यांना थेरपी दिली होती. अपघाताच्या आधीही मी त्यांना भेटले आहे आणि नंतरही भेटले. ते खूप शिस्तीचे आहेत. सकाळी लवकर उठतात, योगा करतात आणि रोजचा ठरलेला दिनक्रम पाळतात. माझ्यासाठी ते मोठ्या भावासारखे आहेत. त्या अपघातात त्यांच्या मांड्यांना सूज होती.”
वैयक्तिक आयुष्याबद्दल काय म्हणाल्या डॉक्टर?
अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल बोलताना डॉ. सुरभी म्हणाल्या की, त्या गोविंदांची पत्नी सुनीता आहुजा यांना कधीही प्रत्यक्ष भेटल्या नाहीत. गोविंदा यांना गोळी लागल्यानंतर फिजिओथेरपीच्या सेशन्सना सुनीता कधीच उपस्थित नव्हत्या.
त्या म्हणाल्या, “मी सुनीता आहुजांना कधीच भेटले नाही. फिजिओथेरपीच्या सेशन्समध्ये त्या कधीच नव्हत्या. गोविंदा खूप खंबीर आहेत आणि मला खात्री आहे की, ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणीही सोडवतील.”
डॉ. सुरभी पुढे म्हणाल्या की, गोविंदा यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चा आणि बातम्यांचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो; पण त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद त्यांच्यात आहे. “त्यांना या सगळ्याचा त्रास होतो. वेदना होतात; पण या सगळ्याला तोंड देण्याची ताकद त्यांच्यात आहे. ते तासन् तास ध्यानधारणा करतात. ते खूप आध्यात्मिक असून, त्यांची देवावर खूप श्रद्धा आहे. स्वतःच्या आयुष्यातील समस्यांशी कसं लढायचं, हे त्यांना माहीत आहे,” असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, गोविंदावर अफेअरचे आरोपही वेळोवेळी होत राहिले आहेत. त्यावर गोविंदानं काही दिवसांपूर्वीच्या मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. त्याबद्दल गोविंदा म्हणालेला, “माझ्यावर कधी आरोप केले गेले नाहीत? सुरुवातीला तर अभिनेत्रींना हात लावतानासुद्धा माझे हात थरथरायचे. तेव्हाही माझ्यावर असे आरोप झाले आहेत. आता हे आरोप करणारी व्यक्ती माझं बालपणीचं प्रेम आहे. प्रेमाच्या बाबतीत माझं काही चाललंच नाही.”
तर नुकत्याच एका व्लॉगमध्ये गोविंदा-सुनीता यांची लेक टीनानंसुद्धा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, “गेली दोन वर्षं आमच्यासाठी फार चांगली नव्हती. आमच्या नात्यात काही चढ-उतार आले.” त्यावर सुनीता म्हणाल्या, “सगळ्या गोष्टी मर्यादेतच व्हायला हव्यात. मी माझी सगळी कर्तव्यं पार पाडली आहेत; पण आता मी स्वतःसाठी जगायला सुरुवात केली आहे.”
