Bollywood Actor On Work Shift Demand : बॉलीवूडमध्ये काही महिन्यांपासून कामाच्या तासांबाबत चर्चा सुरू आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोणने मुलीच्या जन्मानंतर कलाकारांसाठी आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्याची बातमी समोर आल्यानंतर हा विषय अधिक चर्चेत आला.
या पार्श्वभूमीवर अभिनेता कुणाल खेमूने सोहा आली खानच्या पॉडकास्टमध्ये वर्क-लाईफ बॅलन्स आणि फिल्म इंडस्ट्रीच्या कामाच्या पद्धतीबद्दल आपलं मत मांडले.
“निवडलेल्या कामाचे फायदे-तोटे स्वीकारावे लागतात”
पॉडकास्टमध्ये बोलताना कुणाल म्हणाला, “आपण मोठे झाल्यावर आयुष्यात कोणते काम करायचे हे स्वतःच ठरवतो. त्यामुळे त्या कामाबरोबर येणाऱ्या अपेक्षा आणि जबाबदाऱ्या स्वीकाराव्याच लागतात. काही लोक म्हणतात की, आम्हाला फक्त ठरावीक तास काम करायचे आहे आणि उरलेला वेळ इतर गोष्टींसाठी हवा आहे. पण तसे असेल, तर सुरुवातीपासूनच तसा वेळ देणारे काम निवडायला हवं.”
त्याने पुढे सांगितले की, काही वेळा लोकांना या व्यवसायातून मिळणारं यश आणि पैसे हवे असतात; पण त्यासाठी लागणारे कष्ट स्वीकारायची तयारी नसते. “तुम्ही अचानक म्हणू शकत नाही की, आता मला जास्त पैसे द्या आणि कमी काम करू द्या. जर तुम्हाला मोठा सुपरस्टार बनायचं असेल आणि वर्षाला अनेक चित्रपट करायचे असतील, तर त्यासाठी लागणारी मेहनतही घ्यावी लागते”, असं तो म्हणाला.
कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना कुणाल म्हणाला की, आताच्या पिढीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. “अनेकांना प्रवास करायचा आहे, नवनवीन गोष्टी शिकायच्या आहेत; पण त्याच वेळी जर एखादी व्यक्ती दिवसाला १२ तास काम करून जास्त पैसे कमावत असेल, तर त्याबद्दलही तक्रार केली जाते. म्हणजे ऐषारामाचं आयुष्य हवं आहे आणि जास्त पगारही हवा. पण या दोन्ही गोष्टी नेहमी एकत्र जुळतीलच असं नाही,” असे त्याने स्पष्ट केले.
“कामाच्या वेळेवर नियंत्रण हवंय तर निर्माता बना”
कुणालने पुढे सांगितले की, जर कलाकारांना त्यांच्या कामाच्या वेळेवर नियंत्रण हवं असेल, तर त्यांनी स्वतःच आपल्या प्रोजेक्टचे निर्माते व्हावे. तो म्हणाला, “तुम्हाला आठ तास किंवा चार तास काम करायचे असेल तर तुम्ही निर्माता बना. स्वतःचे पैसे गुंतवा आणि निर्णय घ्या. पण जर तुम्हीच दिवसाला दोन तास काम केलं, तर चित्रपट वेळेत पूर्ण होणार नाही आणि खर्चही वाढेल. त्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होऊ शकतं. दुसऱ्यांच्या पैशांवर असे निर्णय घेणे सोपे असतं.”
“आई होण्याचा निर्णयही नियोजन करून घ्यावा”
करिअरच्या शिखरावर असताना कलाकारांनी आई किंवा वडील होण्याच्या निर्णयावरही कुणालनं आपलं मत मांडलं. कुणाल म्हणाला, “आई-वडील होण्याचा निर्णयही नियोजन करूनच घ्यावा लागतो आणि त्याचे काही परिणामही असतात. आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे काही परिणाम असतात. जसं तुम्हाला उत्तम शरीरयष्टी बनवायची असेल, तर जिममध्ये रोज मेहनत घ्यावी लागते. कितीही त्रास होत असेल तरी तक्रार करून चालत नाही.”
आठ तासांच्या शिफ्टवर दीपिका पादुकोण म्हणालेली…
दरम्यान, दीपिका पादुकोणने आठ तासांच्या कामाच्या शिफ्टची मागणी केल्यामुळे तिने ‘स्पिरिट’ आणि ‘कल्की 2898 AD’च्या सीक्वेलमधून बाहेर पडल्याची चर्चा झाली होती. आठ तासांच्या कामाच्या मागणीबद्दल एका मुलाखतीत दीपिकाने सांगितलेलं की ती जे मागत आहे, ते काही अवास्तव नाही. ती म्हणालेली, “इंडस्ट्रीमध्ये आधीपासूनच अनेक कलाकार, विशेषत: पुरुष कलाकार हे अनेक वर्षे आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत आहेत. त्यामुळे ही काही नवीन किंवा चुकीची मागणी नाही.”
