महिलेची भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता, असं सांगितल्यास तुम्हाला विश्वास बसेल का? कदाचित नाही बसणार. पण हे खरं आहे. या अभिनेत्याचं नाव निर्मल पांडे असं आहे. निर्मल पांडे हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अतिशय प्रतिभावान अभिनेते होते. पुरुष असूनही ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार मिळवणारे ते एकमेव भारतीय अभिनेता आहेत.
निर्मल पांडे हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवरील अत्यंत उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. चित्रपटांमधील भूमिका असो किंवा छोट्या पडद्यावरची, ते प्रत्येक वेळी आपल्या भूमिकेत पूर्णपणे एकरूप होऊन जात असत.
निर्मल पांडे यांनी १९९६ मध्ये अमोल पालेकर दिग्दर्शित ‘दायरा’ या चित्रपटात एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना १९९७ च्या फ्रान्समधील प्रतिष्ठित ‘व्हॅलेन्सीन्स फिल्म फेस्टिव्हल’ (Valenciennes Film Festival) मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. एका अभिनेत्याला स्त्री भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.
निर्मल पांडे यांच्या करिअरची सुरुवात
निर्मल पांडे यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून (NSD) पदवीचे शिक्षण घेतले होते. शेखर कपूर यांच्या ‘बँडिट क्वीन’ या चित्रपटातील ‘विक्रम मल्लाह’च्या भूमिकेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. निर्मल पांडेंच्या धारदार नजरेने आणि भारदस्त आवाजाने प्रेक्षकांवर मोठी छाप पाडली होती. निर्मल पांडे यांनी केवळ सकारात्मकच नाही, तर नकारात्मक भूमिकाही ताकदीने साकारल्या.

इस रात की सुबह नहीं, प्यार किया तो डरना क्या, हम तुम पे मरते हैं, लज्जा, आणि वन टू का फोर हे निर्मल पांडे यांचे गाजलेले चित्रपट होय. निर्मल पांडे यांनी ‘दुबई’ नावाच्या मल्याळम चित्रपटातही काम केलं होतं. ‘हातिम’ सारख्या मालिकांमध्ये त्यांनी साकारलेली खलनायकाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. निर्मल पांडे यांना अभिनयाबरोबर गाण्याचीही आवड होती. ‘जज्बा’ नावाचा त्यांचा एक अल्बमही प्रदर्शित झाला होता.
निर्मल पांडे यांचं अकाली निधन झालं होतं. १८ फेब्रुवारी २०१० रोजी अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निर्मल पांडे यांचे मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बॉलीवूडने एक अत्यंत अष्टपैलू कलाकार गमावला. त्यांच्या निधनाच्या अवघ्या काही दिवसांनंतर त्यांचा शेवटचा चित्रपट ‘लाहोर’ प्रदर्शित झाला होता. निर्मल पांडे हे अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी होते ज्यांनी मुख्य प्रवाहातील सिनेमात राहूनही नेहमीच आव्हानात्मक आणि वेगळ्या भूमिका निवडल्या.

