Rajpal Yadav On Cheque Bounce Case Legal Battle : आपल्या विनोदी भूमिकांमुळे चर्चेत राहणारा राजपाल यादव काही दिवसांपूर्वी चेक बाऊन्स प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत आला होता. त्यामुळे त्याला तुरुंगातसुद्धा जावे लागले होते. राजपालने एका चित्रपटासाठी कर्ज घेतले होते आणि तो चित्रपट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर घेतलेले कर्ज फेडण्यात तो अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले होते.
आता राजपालने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले असून, लोक जे समजतात त्यापेक्षा सत्य खूप वेगळे असल्याचे त्याने म्हटले आहे. अभिनेता नेमके काय म्हणालाय? चला जाणून घेऊ…
शुभांकर मिश्राच्या मुलाखतीत राजपाल म्हणाला, “मी मनापासून सांगतो, मी आजवर अशी अनेक कामे केली आहेत, ज्याबद्दल मी कधीच जाहीरपणे बोलणार नाही. कारण- अशा गोष्टी बोलल्या की, त्यांचे महत्त्व संपते. गेल्या २५ वर्षांत माझ्या गावापासून ते मुंबईपर्यंत असा एकही माणूस नाही, जो माझ्या पाठीशी उभा राहिला नाही.”
अभिनेत्याला पाच कोटी रुपये चुकवणे कठीण का गेले, या प्रश्नावर राजपालने सांगितले की, हे प्रकरण वाटते तितके साधे नाही. तो म्हणाला, “हाच खरा प्रश्न आहे. ज्या दिवशी लोकांना हे समजेल, त्या दिवशी त्यांना माझे संपूर्ण प्रकरण उमजेल. मला पैशांअभावी तुरुंगात गेलो नव्हतो, तर तो तत्त्वाचा आणि वादाचा भाग होता.”
तो पुढे म्हणाला, “जर हा विषय फक्त पाच कोटींचा असता, तर तो २०१२ मध्येच संपला असता; पण या पाच कोटींच्या प्रकरणामुळे माझे १७ ते २२ कोटींचे नुकसान झाले.” राजपालने सांगितले की, ज्या चित्रपटासाठी त्याने हे कर्ज घेतले होते, त्यातील बराच भाग पूर्ण झाला होता आणि त्यावर १२ कोटी खर्च झाले होते.
त्यानंतर फसवणुकीच्या आरोपांवर बोलताना राजपाल म्हणाला की, इंडस्ट्रीत १०० पैकी ८० चित्रपट फ्लॉप होतात, याचा अर्थ असा नाही की, ती फसवणूक आहे.
कायदेशीर लढाईनंतरही राजपालने न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास कायम ठेवला आहे. तो म्हणाला, “मी न्यायपालिका आणि संविधानाचा आदर करतो. ही लढाई मी सुरू केली नव्हती, पण ती माझ्यामुळेच संपेल. लोकांनी केवळ वरवरच्या गोष्टी न पाहता संपूर्ण कथा समजून घ्यावी, अशी माझी विनंती आहे.”
