बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव चेक बाउन्स प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. गेल्या महिन्यात तिहार तुरुंगात त्यानं आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर कुटुंबातील लग्नसमारंभासाठी न्यायालयाने त्याला १८ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी शनिवारी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्याने फसवणुकीच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले.

तसेच बॉलीवूड इंडस्ट्रीकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी अभिनेत्याने प्रियदर्शन यांनी त्याच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया दिली. आर्थिक संकटात सापडलेल्या राजपालबद्दल बोलताना दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी कमी शिक्षणामुळे त्याच्याकडून मोठी चूक झाली असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यावर राजपालने आता नाराजी व्यक्त केली आहे.

प्रियदर्शन यांच्या विधानावर राजपालचं उत्तर

‘स्क्रीन’बरोबरच्या संवादात राजपाल म्हणाला, “हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रियदर्शनजी मला पूर्णपणे ओळखत नाहीत. मी सुशिक्षित आहे. मी वयाच्या ११ व्या वर्षापासून काम करतोय. मोठमोठे लोकही अनेकदा अडचणीत येतात, पण त्याचा त्यांच्या शिक्षणाशी काही संबंध नसतो. जर मी कमी शिक्षित असतो, तर २५-३० वर्षे या इंडस्ट्रीत टिकू शकलो नसतो.”

यापुढे राजपाल म्हणाला, “मी तीन दिग्दर्शकांचा खूप आदर करतो. एक म्हणजे राम गोपाल वर्मा, डेव्हिड धवन आणि प्रियदर्शन. या तिघांबरोबर मी ५० हून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. मात्र, माझ्या आयुष्याची संपूर्ण कहाणी त्यांना माहीत नाही. त्यामुळे अशा मतांना फारसे महत्त्व नाही.”

राजपाल यादवबद्दल प्रियदर्शन काय म्हणालेले?

मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन राजपालबद्दल म्हणालेले, “मी राजपालला २० वर्षांहून अधिक काळापासून ओळखतोय. माझा त्याच्याबरोबरचा पहिला चित्रपट ‘मालामाल वीकली’ हा होता. त्यानंतर त्यानं माझ्या बहुतेक चित्रपटांत काम केलं आहे. माझ्या पुढील चित्रपटाच्या निर्मात्यांना (ज्युबिली फिल्म्स) मी सांगितलं आहे की, राजपालला त्याच्या सध्याच्या मानधनापेक्षा जास्त पैसे द्यावेत. मला राजपालच्या आर्थिक अडचणींबद्दल माहिती होती. म्हणूनच मी त्याला प्रत्येक चित्रपटात काम दिलं. जाहिरातींमध्येही त्याला संधी दिली. कमी शिक्षणामुळे त्याच्याकडून मोठी चूक झाली; पण राजपाल मनानं खूप चांगला आहे.”

दरम्यान, राजपाल यादव लवकरच प्रियदर्शन यांच्यासह ‘भूत बंगला’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्यानंतर तो ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हैवान’ या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय दोन वेबसीरिज आणि आणखी दोन चित्रपटांवरही तो काम करत आहे.