Bollywood Actor Rajpal Yadav : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवसाठी २०२६ या नवीन वर्षाची सुरुवात खूपच कठीण झाली. जुन्या चेक बाउन्स प्रकरणामुळे त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. मात्र, या संकटाच्या काळात संपूर्ण इंडस्ट्री त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी राजपालला आर्थिक मदत केली, ज्यामुळे त्याचे कर्ज काही प्रमाणात फेडले गेले आणि कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव सध्या त्यांच्या ‘भूत बंगला’ या आगामी नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ठिकठिकाणी तो मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याने त्याला पुनर्जन्म मिळाल्याचं सांगितलं. तुरुंगात गेल्याचा आणि त्यानंतरचा संघर्ष हा त्याला नवीन नाही. कारण त्याने लहानपणीच मृत्यूला जवळून पाहिल्याचं सांगितलं.

कर्ली टेल्स या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजपाल यादवने बालपणीची जुनी आठवण सांगितली. तो म्हणाला, “मी गंगा नदीत पोहायलो गेलो होतो, तेव्हा मी माझ्या डोळ्यांदेखत मृत्यू पाहिला होता. मी तेव्हा किमान दहा वर्षांचा होतो. मी माझ्या आत्याकडे गेलो होतो आणि तेव्हा माझ्यासारखीच काही मुले नदीत पोहायला गेली होती. सर्वांनी नदीत उडी मारली, म्हणून मीसुद्धा मारली. नंतर नदीच्या पाण्यात भोवरा आला, सगळे त्यातून निघाले आणि मी अडकलो. मला बाहेर कसं यायचं तेच कळत नव्हतं. मी एक मिनिट त्यात अडकून होतो.”

Award Banner

यापुढे राजपाल म्हणाला, “मला बुडताना पाहून सगळे जण ओरडत होते. तेव्हा एक जण माझ्या दिशेने पळत येताना मला दिसला. तोपर्यंत मला शुद्ध होती. त्यानंतर त्या व्यक्तीने माझ्या दिशेने बोट केले आणि त्यानंतर मी बेशुद्धच झालो. पुढे काय घडलं ते मला आठवतच नाही. किमान ४० वर्षांपूर्वीची ही गोष्ट घडली होती आणि ती माझ्या आयुष्यातली पहिली फाईट होती. माझे सगळे भावंडं विचारत होते की, या सगळ्यातून मी जीवंत कसा वाचलो. त्यामुळे एकप्रकारे हा माझा पुनर्जन्म आहे.”

दरम्यान, राजपालच्या आगमी कामाबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो ‘भूत बंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमारदेखील मुख्य भूमिकेत आहे. त्याचबरोबर तो ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटातही दिसणार आहे. याव्यतिरिक्त त्याच्याकडे दोन वेबसीरिज आणि दोन सिनेमेदेखील आहेत. त्यामुळे आता त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते उत्सुक आहेत हे नक्की…