Ranbir Kapoor Ramayan Movie Look : बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाची काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. अशातच या चित्रपटातला रणबीर कपूरच्या लूकचा एक फोटो समोर आला आणि त्याच्या या लूकबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे. सोशल मीडियावरील व्हायरल फोटोंमध्ये रणबीर कपूर श्रीराम यांच्या भूमिकेतल्या लांब केसांचा लूक लोकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोमध्ये त्याने भगव्या रंगाचे धोतर घातल्याचे पाहायला मिळत असून, त्यावर काळ्या रंगाचे लांब जॅकेट परिधान केलेले आहे. लांब केस आणि पारंपरिक वेश असलेला त्याचा हा श्रीरामांच्या अवतारातला लूक लक्ष वेधून घेत आहे. मात्र, यात त्याच्या केसांच्या स्टाईलवरून सोशल मीडियावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
या लूकमध्ये रणबीरने घातलेला केसांचा विग अनेक नेटकऱ्यांना आवडलेला नाही. त्यामुळे काही जणांनी या लूकवर टीका केली आहे; तर काही जण म्हणत आहेत की, हा फोटो कदाचित जुना असू शकतो.
रणबीरच्या लुकवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
रणबीरच्या या लूकवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी या चित्रपटाची तुलना ‘आदिपुरुष’ या चित्रपटाशी केली आहे; तर काहींनी चित्रपटाच्या बजेटवर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने अशी कमेंट केली आहे, “४०० मिलियन डॉलर्सचा बजेट असूनही एक चांगला विग मिळाला नाही का?” तर दुसऱ्यानं “बॉलीवूडमध्ये नकली केस आणि नकली दाढीच्या बाबतीत अनेकदा कमतरता दिसून येते”, असं म्हटलं आहे. तर काही जण म्हणाले की, असे लुक्स तर टीव्ही मालिकांमध्येही पाहायला मिळतात.
पुढे एकानं, “खरं सांगायचं तर रणबीरचा हा लूक थोडा विचित्र वाटतोय” अशी कमेंट केली आहे. तर काही जणांचं मत आहे की, या भूमिकेसाठी रणबीरचा आवाज किंवा व्यक्तिमत्त्व योग्य वाटत नाहीय. या चित्रपटातील रणबीरची कास्टिंग योग्य नसल्याचंसुद्धा काहींनी म्हटलं आहे.

या चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा आहेत आणि हा मायथॉलॉजिकल चित्रपट दोन भागांत येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे चित्रपटाचं बजेट हे ४०० ते ५०० मिलियन डॉलर इतकं असू शकतं. तसंच काही रिपोर्टनुसार, हॉलीवूडचे प्रसिद्ध फिल्ममेकर क्रिस्टोफर नोलन यांनाही या प्रोजेक्टमध्ये विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. ते चित्रपटाच्या एडिटिंगचा आढावा घेणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटात हॉलीवूडमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर येणार ‘रामायण’
चित्रपटात रणबीर कपूरबरोबर साई पल्लवी, यश, सनी देओल, रवी दुबे, विवेक ओबेरॉय, लारा दत्ता व रकुल प्रीत सिंह यांसारखे अनेक कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
