देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा आज (२८ मे) दिल्लीत पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासन चर्चेत असणाऱ्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जात आहे. देशाच्या नव्या संसद भवनाचा लोकार्पण सोहळा सुरु असताना आता सिनेसृष्टीतून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेता शाहरुख खानने नुकतंच नव्या संसद भवनाचा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त केले आहे.
अभिनेता शाहरुख खानने देशाच्या नव्या संसद भवनाच्या इमारतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्याने व्हॉईस ओव्हर दिला आहे. दीड मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खान म्हणाला, “भारताचे नवीन संसद भवन, आमच्या आशांचे नवीन घर. आपल्या संविधानाची काळजी घेणाऱ्यांसाठी एक असे घर जिथे १४० कोटी भारतीय एक कुटुंब असेल. हे नवीन घर इतकं मोठं असावं की त्यात देशातील प्रत्येक प्रांत, राज्य, गाव, शहर यांसाठी जागा असू शकेल. या घराचे हात इतके लांब असावेत की देशातील प्रत्येक जाती-वर्णातील प्रत्येक धर्मावर प्रेम करता येईल. त्याचे डोळे इतके खोल असावेत की ते देशातील प्रत्येक नागरिकाला पाहू शकेल. त्यांना तपासू शकेल, त्यांच्या समस्या ओळखू शकेल. इथे सत्यमेव जयते हे केवळ घोषणेपुरते मर्यादित नसून त्यावर प्रत्येकाला विश्वास असेल. इथे हत्ती-घोडा, सिंह आणि अशोक चक्राचा स्तंभ हा लोगो नसून तो एक इतिहास असेल.”
आणखी वाचा : “तमिळ सत्तेचे प्रतीक असलेला राजदंड…” सुपरस्टार रजनीकांत यांचे ट्वीट चर्चेत, नव्या संसद भवनासाठी मानले मोदींचे आभार




शाहरुखने हा व्हिडीओ पोस्ट करत त्याला कॅप्शनही दिले आहे. ‘आपल्या संविधानाचे समर्थन करणारे, या महान देशाच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करणारे आणि त्यातील वैयक्तिक लोकांच्या विविधतेचे रक्षण करण्यांसाठी नरेंद्र मोदींनी किती सुंदर घराची निर्मिती केली आहे. नवीन भारतासाठी नवीन संसद भवन, पण भारताच्या गौरवासाठी जुन्या स्वप्नांसह. जय हिंद! माझे संसद भवन माझा अभिमान, असे शाहरुख खानने म्हटले आहे.
आणखी वाचा : “हे सदैव…” नव्या संसद भवनाचा व्हिडीओ पोस्ट करत अक्षय कुमारचे ट्वीट, पंतप्रधान मोदी म्हणाले “तुमचे विचार…”
शाहरुख खानच्या या ट्वीटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही प्रतिक्रिया दिली आहे. फारच सुंदर. नवीन संसद भवन हे लोकशाहीची ताकद आणि प्रगतीचे प्रतीक आहे. ते परंपरेला आधुनिकतेशी जोडलेले असेल, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. ९७१ कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या नवीन संसद भवनात ८८८ लोकसभा आणि ३०० राज्यसभा सदस्यांसाठी जागा असेल. लोकसभेची रचना संयुक्त अधिवेशनासाठी केली जात आहे