Shahid Kapoor Fitness : बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा केवळ त्याच्या अभिनयासाठीच नव्हे, तर फिटनेससाठीही तितकाच ओळखला जातो. घरात असो किंवा शूटिंगच्या सेटवर, तो साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेला योग्य तेवढं महत्त्व देतो. यामुळे त्याच्या अभिनयासह फिटनेसचीदेखील चर्चा होताना दिसते. अशातच त्यानं त्याचा फिटनेस रुटीनबद्दल माहिती दिली आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत शाहिद आपल्या अभिनय प्रवास, आहार आणि दिनचर्येबद्दल मोकळेपणाने बोलला. यावेळी त्यानं त्याच्या रोजच्या व्यायामाच्या टिप्स तसंच आहाराबद्दलची माहितीसुद्धा शेअर केली. तसंच रोजच्या थकाथकीच्या जीवनात असलेलं झोपेचं महत्त्वदेखील विशद केलं.

फिटनेसबद्दल अभिनेता म्हणाला, “माझ्यासाठी फिटनेस म्हणजे जास्त कष्ट नव्हे, तर सातत्य. माझ्या व्यायामात साधारणपणे फंक्शनल ट्रेनिंग, ताकद वाढवणारे व्यायाम आणि शरीर लवचिक ठेवणारे एक्सरसाइज असतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहतं. मी सकाळी व्यायाम करणं पसंत करतो, त्यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होते. शक्य असेल तेव्हा थोडं कार्डिओ करतो. जेणेकरून कंटाळा येत नाही.

स्वत:ची दिनचर्या सांगत शाहिद म्हणाला की, “मला माझी सकाळ साधी आणि शांत असलेली आवडते. उठल्यानंतर मी थोडा वेळ श्वसनाचे व्यायाम करतो. त्यामुळे शरीर जागं होतं आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. जर शूटिंग असेल तर मी उपाशीपोटी सकाळीच व्यायाम करतो. त्यामुळे सेटवर जाण्यापूर्वी किमान साडेतीन तास आधी उठतो.

यानंतर त्यानं झोपेचं महत्त्वही सांगितलं. तो म्हणाला, “झोप हा आयुष्याचा फारच दुर्लक्षित भाग आहे, असं मला वाटतं. बहुतेक वेळा मी सुमारे सहा तास झोप घेतो. मात्र ते शूटिंगच्या वेळापत्रकावर अवलंबून असतं. सलग शूटिंग असेल तर झोप कमी होते, पण मिळेल तेव्हा ती भरून काढण्याचा मी प्रयत्न करतो. पुरेशी विश्रांती घेतली तर फक्त शरीरच नव्हे, तर मनही ताजंतवानं राहतं.”

यापुढे त्याने आहाराबद्दल सांगितलं की, मी शाकाहारी असल्यामुळे माझा आहार आपोआपच संतुलित राहतो. त्यात भरपूर पालेभाज्या, भाजीपाला आणि डाळी यांचा समावेश असतो. विशेषतः साधं, घरचं जेवण खाणं पसंत करतो. मी जड आणि अपायकारक पदार्थ टाळतो आणि रात्री उशिरा खाणंही टाळतो, कारण त्याचा परिणाम माझ्या शरीरावर होतो. मी थोडं-थोडं आणि वेळच्या वेळी खातो. त्यामुळे शरीर हलकं वाटतं.”