Bollywood Actor Sonu Sood Offers Help : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण झाली असून विमानसेवा बंद करण्यात आली आहे. तिथल्या विमानतळावर अनेक प्रवासी अडकले आहेत. यामुळे दुबई, अबू धाबी आणि कतारसारख्या शहरांमध्ये अनेक प्रवासी अडकले आहेत. ते आपल्या मायदेशी परत जाऊ शकत नाहीयत. या कठीण प्रसंगात बॉलीवूड अभिनेता सोनू सूद अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

सोनू सूदने कोरोनाच्या काळात, तसंच नंतर पंजाबमध्ये आलेल्या पुराच्यावेळी लोकांना मदत केले होती. याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक झालं होतं. अशातच आता त्याने पुन्हा एकदा अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिका-इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, दुबईमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी तो पुढे आला आहे.

सोनू सूदने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत घोषणा केली आहे की, जे प्रवासी दुबईमध्ये अडकले आहेत आणि ज्यांच्याकडे राहण्याची व्यवस्था नाही, त्यांना तो मोफत राहण्याची सुविधा देत आहे. त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी थेट संपर्क साधण्यास सांगितलं आहे. जेणेकरून ही मदत लवकरात लवकर थेट गरजूंपर्यंत पोहोचू शकेल.

सोनू सूदने आपल्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, “नमस्कार, युद्धाच्या परिस्थितीमुळे अनेक प्रवासी दुबईमध्ये अडकले आहेत. तुमच्याकडे राहण्याची व्यवस्था नसेल तर आम्ही मोफत आणि सुरक्षित निवास देत आहोत. भारतीय असो किंवा कोणत्याही देशाचे लोक असो, जे सध्या दुबईमध्ये अडकले असतील ते सुरक्षितपणे आपल्या देशात परत जाईपर्यंत आम्ही तुमच्या राहण्याची मोफत व्यवस्था करू. यासाठी कोणतीही अट नाहीये किंवा कसलाच भेदभाव नाहीय आहे. यामागे आहे ती फक्त मानवतेची भावना” मदतीची गरज असलेल्या लोकांनी इन्स्टाग्रामवर मेसेज करावा किंवा दुबईतील प्रॉपर्टी डेव्हलपर Dugasta Properties यांच्याशी थेट संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

सोनू सूदने शेअर केलेला व्हिडीओ

सोनू सूदचं नेटकऱ्यांकडून कौतुक

सोनू सुदनं जाहीर केलेल्या या मदतीबद्दल त्याचं सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. “जगात अशाच प्रकारची मानवता पाहिजे”, “या उपक्रमाला सलाम”, “याला म्हणतात खरा हिरो”, “तुमच्या मानवतेला सलाम”, “तुम्ही फक्त चित्रपटांतले नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो आहात”, “तुमचा खूप अभिमान वाटतो” या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे सोनूचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

दुबईमध्ये सेलिब्रिटीही अडकले होते

प्रवासात झालेल्या अडचणींमुळे बॉलीवूडचे काही कलाकारही अडकले होते. अभिनेत्री ईशा गुप्ता आणि सोनल चौहान यांनी सोशल मीडियावर माहिती दिली होती. आता दोघीही सुरक्षितपणे भारतात परतल्या आहेत. तसंच मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी त्यांचा मुलगासुद्धा कुवेतमध्ये अकडल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या मुलाला भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं.