रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. आता नुकतंच या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत अन् हा चित्रपट ‘मंडे टेस्ट’मध्ये पास झाल्याचं समोर येत आहे. पहिल्या चार दिवसांत या चित्रपटाची भारतातील कमाई २४० कोटींच्या पार गेली.
सोमवारचे कलेक्शन पाहता लवकरच रणबीरचा ‘अॅनिमल’ ३०० कोटींचा टप्पाही पार करेल असं चित्र पाहायला मिळत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ३९.९ कोटींची कमाई केल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटावर बरेच लोक टीका करत आहेत तर राम गोपाल वर्मासारख्या काही दिग्दर्शकांनी चित्रपटाचं, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचं अन् रणबीरच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
अशातच बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेता व समीक्षकाने रणबीरचं कौतुक करत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानवर निशाणा साधला आहे. शाहरुखने बऱ्याच मुलाखतीमध्ये हे म्हंटलं आहे की तो सुपरस्टार्सच्या यादीतील शेवटचा स्टार आहे, त्यांच्यानंतर कोणालाच एवढं स्टारडम मिळणं कठीण आहे. शाहरुख खानच्या याच वक्तव्याला कमाल आर खान म्हणजेच केआरकेने त्याच्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. ‘अॅनिमल’ पाहून केआरके ने रणबीरचं कौतुक केलं आहे.
रणबीरने शाहरुखला खोटं सिद्ध केलं असल्याचा दावा केआरकेने केला आहे. ‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर ट्वीट करत केआरके लिहितो, “शाहरुखचं एक वक्तव्य रणबीरने खोडून काढलं आहे. आज रणबीर अभिमानाने सांगू शकतो की सुपरस्टार्सच्या यादीतील शाहरुख खान हा शेवटचा स्टार नव्हे.” रणबीरच्या ‘अॅनिमल’मधील कामाची सगळेच लोक प्रशंसा करत आहेत. केआरकेने रणबीरल पुढील सुपरस्टार गृहीत धरून शाहरुखवर तोंडसुख घेतलं आहे. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, यांच्या मुख्य भूमिका आहेत.