हमास या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे सारं जग हादरलं आहे. हमासकडून एकाचवेळी तब्बल ५ हजार रॉकेट्स इस्रायलवर डागण्यात आले. या घटनेनंतर इस्रायल सरकारने अवघ्या काही तासांत युद्धाची घोषणा केली. गेल्या कित्येक वर्षांमध्ये इस्रायलच्या भूमीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यात इस्रायलमध्ये किमान १०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७४० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे, इस्रायलकडून केलेल्या हवाई हल्ल्यात गाझामध्ये सुमारे १९८ जणांचा मृत्यू झाला. तर १६०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणावर बरीच लोक व्यक्त होत आहेत. भारतातील लोक तसेच सेलिब्रिटीजसुद्धा यावर व्यक्त होत आहे. आणखी वाचा : इस्रायल-पॅलेस्टाइन पार्श्वभूमीवर शाहरुख खानचं 'ते' जुनं ट्वीट होतंय व्हायरल; नेटकरी म्हणाले "गद्दार…" अशातच अभिनेत्री स्वरा भास्करनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर कायम निर्भीडपणे बोलणाऱ्या स्वराने 'इस्रायल-पॅलेस्टाईन'मधील या भयावह युद्धावर आपलं मत मांडल्याने ती सध्या चर्चेत आली आहे. स्वराने आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीमधून तिचं मत मांडत इस्रायलवर टीका केली आहे. आपल्या स्टोरीमध्ये स्वरा लिहिते, "जेव्हा इस्रायलने पॅलेस्टाईनवर हल्ला केला, पॅलेस्टीनी लोकांची घरं बेचिराख केली, तिथल्या लहान मुलांवरही त्यांनी दया केली नाही, १० वर्षांपासून त्यांनी गाझावर कित्येक बॉम्बहल्ले केले, तेव्हा तुम्हाला धक्का बसला नसेल. त्यामुळेच इस्रायलवर झालेल्या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करणारी मंडळी मला ढोंगी वाटतात." फोटो : सोशल मीडिया स्वरा भास्करची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. काहींनी स्वराच्या या पोस्टचं समर्थन केलं आहे तर काहींनी तिला इतिहासाचे संदर्भ देत तिची चांगलीच कानउघडणी केली आहे.