Bollywood Acress Reveals Her Relation With Indira Gandhi : ‘गदर’, ‘कहो ना प्यार है’, ‘हमराज’ व ‘भूल भुलैया’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री म्हणजे अमीषा पटेल. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि तिच्या कुटुंबाचे जवळचे संबंध असल्याचे सांगितले.

इतकेच नाही, तर अमीषाचा जन्म झाला, तेव्हा तिला रुग्णालयात भेटायला येणारी पहिली व्यक्ती इंदिरा गांधी होत्या, असा खुलासाही तिने केला आहे.

‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अमीषा म्हणाली, “माझा जन्म ब्रीच कँडी रुग्णालयात झाला होता. तेव्हा मला बघायला येणारी पहिली व्यक्ती इंदिरा गांधी होत्या.” यावेळी अमीषाने तिचे आजोबा रजनी पटेल यांचाही उल्लेख केला. रजनी पटेल हे एक प्रसिद्ध बॅरिस्टर होते.

अमीषा पटेलचे गांधी घराण्याशी कनेक्शन

अमीषा म्हणाली, “माझे आजोबा रजनी पटेल हे बॅरिस्टर होते. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पंडित जवाहरलाल नेहरू हे लहानपणापासूनच त्यांचे मार्गदर्शक होते. राजकारणात आल्यावर आजोबा सुरुवातीला कम्युनिस्ट पार्टीत होते आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना इंदिरा गांधी त्यांच्या सर्वांत जवळच्या सहकारी होत्या. आजोबा त्यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम पाहायचे.”

अमीषा पुढे म्हणाली, “आजोबांनी काँग्रेसचे कोषाध्यक्ष व अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी इंदिरा गांधी माझ्या आजोबांशी चर्चा करायच्या किंवा त्यांचा सल्ला घ्यायच्या. आजोबांनी संपूर्ण भारतातील अनेक मुख्यमंत्र्यांसाठी निधी उभारण्याचे कामही केले होते.”

इंदिरा गांधींनी ठरवली होती लग्नाची तारीख

अमीषाने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाबाबतही एक आठवण सांगितली. ती म्हणाली, “माझ्या आई-वडिलांच्या लग्नाची तारीख खुद्द इंदिरा गांधींनीच ठरवली होती. लग्नासाठी कोणतीही कुंडली पाहिली गेली नव्हती. इंदिरा गांधी कधी उपलब्ध आहेत, हे त्यांना विचारले गेले आणि त्यांनी दिलेल्या वेळेनुसार ४ जुलै ही तारीख पक्की करण्यात आली. दक्षिण मुंबईतील कोलाबा येथील ‘ताज महाल पॅलेस’मध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.” यापूर्वीही रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये अमीषाने या खास आठवणींना उजाळा दिला होता.

दरम्यान, अमीषाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची २०२४ मध्ये ‘तौबा तेरा जलवा’ या चित्रपटात दिसली होती. त्यापूर्वी २०२३ मध्ये ती ‘गदर २’ व ‘मिस्ट्री ऑफ द टॅटू’मध्ये झळकली होती. तिने अजून नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नाही. अमीषा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करताना दिसते.