Bipasha Basu Career & Personal Life: अभिनेत्री बिपाशा बासू हिला बॉलीवूडमध्ये २५ वर्षे झाली आहेत. बिपाशाने करिअरमध्ये ४० पेक्षा जास्त चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आपल्या उत्तम अभिनयाने बिपाशाने प्रेक्षकांची मनं जिंकली. बिपाशा अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. बॉलीवूडची बोल्ड अभिनेत्री बिपाशा मागील अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आज ७ जानेवारी रोजी बिपाशाचा ४६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

बिपाशा बासूचा जन्म ७ जानेवारी १९७९ रोजी एका बंगाली कुटुंबात झाला. तिचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीत झाले. त्यानंतर ती मॉडेलिंग आणि अभिनयात करिअर करण्यासाठी मुंबईत आली. अभिनेत्रीने २००१ मध्ये आलेल्या ‘अजनबी’ चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिने इतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी काही हिट ठरले तर काही फ्लॉप झाले. चला तिच्या करिअरवर एक नजर टाकुयात.

बिपाशा बासूने १५ वर्षांत केले ४१ चित्रपट

बिपाशा बासूने तिच्या करिअरमध्ये ४१ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा पहिला चित्रपट ‘अजनबी’ बॉक्स ऑफिसवर सरासरी हिट ठरला होता. त्यानंतर २००२ मध्ये तिने तीन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यापैकी ‘राज’ हिट झाला, तर ‘चोर मचाये शोर’ आणि ‘गुनाह’ दोन्ही फ्लॉप झाले होते. मग २००३ मध्ये तिने तीन चित्रपट केले. त्यातील ‘जिस्म’ हिट झाला, ‘फूटपाथ’ फ्लॉप झाला आणि ‘जमीन’ सिनेमाने सरासरी कमाई केली होती.

दोन वर्षांत बिपाशाने केले १० चित्रपट

बिपाशा बासूने २००४-२००५ या दोन वर्षांत तब्बल १० चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्यापैकी बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले. फ्लॉप चित्रपटांच्या यादीत ‘इश्क है तुमसे’, ‘ऐतबार’, ‘रुद्राक्ष’, ‘मदहोशी’, ‘शिखर’ आणि ‘बरसात’ यांचा समावेश आहे. ‘अपहरण’ आणि ‘नो एंट्री’ हिट झाले, तर ‘चेहरे’ चित्रपट सरासरी हिट ठरला. या फ्लॉप चित्रपटांनंतर बिपाशाच्या करिअरला ब्रेक लागला.

दोन वर्षांत ४ फ्लॉप चित्रपट

बिपाशा बासूच्या करिअरमधील फ्लॉप चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. २००६ ते २००८ या काळात बिपाशाने ११ चित्रपट केले, त्यापैकी चार फ्लॉप झाले. यामध्ये ‘डरना जरूरी है’, ‘जाने होगा क्या’, ‘नहले पे दहला’, ‘गोल’ यांचा समावेश होता. तर २००६ मध्ये आलेले ‘फिर हेरा फेरी’ व ‘रेस’ हे चित्रपट हिट झाले.

बिपाशाचं फिल्मी करिअर फार यशस्वी राहिलं नाही. २००८ ते २०२५ या काळातील तिचे ‘अलोन’, ‘क्रिएचर’, ‘हमशकल्स’, ‘आत्मा’, ‘जोडी ब्रेकर्स’, ‘प्लेयर्स’, ‘दम मारो दम’, ‘आक्रोश’, ‘लम्हा’ व ‘पंख’ सिनेमे फ्लॉप झाले. तर ‘ऑल द बेस्ट’, ‘राज 3’ हिट झाले.

बिपाशा बासूने २०१६ मध्ये अभिनेता करण सिंह ग्रोव्हरशी लग्न केलं. बिपाशा करणची तिसरी बायको होय. लग्नानंतर ६ वर्षांनी २०२२ मध्ये बिपाशा व करण यांनी त्यांच्या पहिल्या लेकीचं स्वागत केलं. त्यांनी मुलीचं नाव देवी ठेवलं आहे. सध्या बिपाशा मोठ्या पडद्यापासून दूर आहे आणि पती व मुलीबरोबर आयुष्य एंजॉय करतेय.