scorecardresearch

तृतीयपंथीयांची खिल्ली उडवणाऱ्याला सेलिना जेटलीने सुनावले खडेबोल; म्हणाली, “तुमच्यासारखे लोक…”

सेलिना जेटलीने २००३ मध्ये ‘जानशीन’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते

celina jaitley about transgenders
ट्रान्सजेंडर कम्युनिटीबद्दल चुकीच्या भाषेत टिप्पणी करणाऱ्या युझरला सेलिना जेटलीचं चोख उत्तर (फोटो : सोशल मीडिया)

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलत असते तसेच सोशल मीडियावर ती बेधडकपणे तिची मतं मांडत असते. आता सेलिना जेटलीने सोशल मीडियावर युझरची चांगलीच शाळा घेतली आहे. ‘इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर डे ऑफ व्हिजिबिलिटी’च्या निमित्ताने सेलिनाने एक पोस्ट शेअर केली ज्यावर एका ट्विटर युझरने चुकीच्या पद्धतीने टिप्पणी केली.

सेलिना जेटलीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती तृतीयपंथी समुदायाचे समर्थन करताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जगातील सर्वात धाडसी ट्रान्सजेंडर लोकांपैकी काही. मी त्यांच्यावर होणारा भेदभाव आणि हिंसाचाराविरुद्ध लढण्यास तयार आहे आणि आपल्या समाजातील त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा करते.”

आणखी वाचा : अनुपम खेर यांनी केलेला श्रीदेवीच्या बहिणीचा लूक; व्हायरल फोटो शेअर करत अभिनेता जुन्या आठवणींमध्ये रममाण

अभिनेत्रीच्या या ट्विटला उत्तर देताना एका युजरने लिहिले की, ” तृतीयपंथी लोक मला फक्त ट्रॅफिक सिग्नलवर दिसतात.” युझरच्या या ट्वीटला प्रतिक्रिया देताना सेलिना म्हणाली, “सर यात नेमका विनोद काय आहे? एखादी व्यक्ती ट्रान्सजेंडर आहे म्हणून त्यांना भीक मागायला भाग पाडलं जातं ही गोष्ट हृदयद्रावक नाही का? यासाठी खरंच जनजागृतीची गरज आहे.”

सेलिना जेटलीच्या या ट्विटला युजरने पुन्हा उत्तर दिलं, त्याने ट्वीटमध्ये लिहिले की, “ते भीक कशी मागतात हे तुम्ही पाहिले आहे का? ते फक्त भीक मागत नाहीत तर ते सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करतात. ही लोक भीक मागण्याच्या उद्देशाने ट्रॅफिक सिग्नलवर काय करतात हे तुम्हाला योग्य वाटते का? कदाचित याला कारणीभूत तुमची जडणघडण असते असं मला वाटतं.”

celina jaitley tweet 1
फोटो : सोशल मीडिया

युझरच्या या कॉमेंटवर सेलिनाने पुन्हा उत्तर देत त्याला चांगलेच खडेबोल सुनावले. “माझ्या जडणघडणीची अजिबात चिंता करू नका. मी भारतीय सैन्याच्या चार पिढ्यांमध्ये राहून लहानाची मोठी झाले आहे. ट्रान्स कम्युनिटीमधील लोक हे आपल्या आपल्या देशात अजूनही वंचितांपैकी एक आहेत. तुमच्यासारखे लोक बहिष्कार टाकून त्यांच्यासाठी जीवनाचा हा संघर्ष अधिक कठीण करतात आणि त्यांच्या दुर्दशेला तुमच्यासारखीच लोक जबाबदार आहेत.”

celina jaitley tweet 2
फोटो : सोशल मीडिया

सेलिना जेटलीने २००३ मध्ये ‘जानशीन’ चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती ‘नो एंट्री’, ‘अपना सपना मनी मनी’ आणि ‘गोलमाल रिटर्न्स’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकली. आजकाल अभिनेत्री पती पीटर हागसोबत ऑस्ट्रियामध्ये राहते आणि देशातील अशाच गंभीर समस्यांबद्दल ती मोकळेपणाने बोलते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 12:31 IST

संबंधित बातम्या