scorecardresearch

शाहरुख खानबरोबर काम करूनही अभिनेत्रीवर आली ‘ही’ वेळ; डेलनाज इराणीने व्यक्त केली खंत

शाहरुख खानच्या सुपरहीट ‘कल हो ना हो’ या चित्रपटात तिने छोटीशी भूमिका साकारली होती

शाहरुख खानबरोबर काम करूनही अभिनेत्रीवर आली ‘ही’ वेळ; डेलनाज इराणीने व्यक्त केली खंत
डेलनाज इराणी (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी मध्यंतरी काम मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने जाहीरपणे विनंती केली होती तसाच काहीसा मार्ग आता अभिनेत्री डेलनाज इराणीने स्वीकारला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने चित्रपट निर्माते आणि टेलिव्हिजन निर्मात्यांकडे कामासाठी विनंती केली आहे. डेलनाजने काही टेलिव्हिजन मालिकांमध्ये भूमिका केली आहे, शिवाय २००३ च्या शाहरुख खानच्या सुपरहीट ‘कल हो ना हो’ या चित्रपटात डेलनाजने छोटीशी भूमिका साकारली होती.

या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं फार कौतुक झालं, शिवाय प्रेक्षकांनाही ती भूमिका प्रचंड आवडली. त्यानंतर मात्र डेलनाज कुठेच फारशी दिसली नाही. रेडिओ जॉकी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेलनाजने या मनोरंजनसृष्टिपासून दूर फेकलं गेल्याची खंत व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर सध्या सोशल मीडिया स्टार्सना अभिनेत्यांपेक्षा जास्त पसंत केलं जातं ही खंतसुद्धा तिने व्यक्त केली आहे.

आणखी वाचा : ‘JNU’ मध्ये ब्राह्मणविरोधी घोषणा; शर्लिन चोप्राने केला तीव्र शब्दांत निषेध, म्हणाली, “केंद्र सरकार…”

डेलनाज म्हणाली, “आधी कलाकार आणि दिग्दर्शक निर्माते यांच्यात थेट संवाद व्हायचा, ‘कल हो ना हो’मधील काम पाहून सतीश कौशिक यांनी मला थेट संपर्क साधला होता. सध्याच्या काळात हा संपर्कच नाहीसा झाला आहे. सध्या मॅनेजर्स, कास्टिंग डायरेक्टर्स यांच्या माध्यमातूनच संपर्क साधता येतो. यामुळेच कदाचित मनोरंजनसृष्टीत कंपूशाही वाढली आहे.”

याबरोबरच डेलनाजने सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाबद्दलही भाष्य केलं आहे. याविषयी डेलनाज म्हणते, “गेली दोन दशकं माझ्या कित्येक मैत्रिणी या क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनासुद्धा काम मिळणं कठीण झालं आहे. कास्टिंग डायरेक्टर्सनी त्यांना काम देणं बंद केलं आहेत कारण त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटला ब्लु टिक नाही.” रातोरात स्टार झालेल्या लोकांमुळे कित्येक वर्षं मेहनत करणाऱ्या लोकांवर अन्याय होत आहे असंही डेलनाजने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. डेलनाज सध्या चित्रपटसृष्टीत काम शोधत आहे हे तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 19:25 IST

संबंधित बातम्या