Himani Shivpuri Husband Death DDLJ Climax: आदित्य चोप्रा यांच्या १९९५ मधील ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील ‘कम्मो कौर’ म्हणजेच अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अनुपम खेर आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती, मात्र चित्रपटाच्या जबरदस्त क्लायमॅक्स सीनमध्ये हिमानी शिवपुरी दिसल्या नव्हत्या. शूटिंगच्या अवघ्या दोन-तीन दिवसांआधीच त्यांचे पती ज्ञान शिवपुरी यांचे अचानक निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर अंत्यसंस्कार, शवविच्छेदन आणि पोलीस ठाण्यातील प्रसंगांना त्यांना एकटीने तोंड द्यावे लागले होते, त्याबद्दल त्यांनी सांगितलं.

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी काजोलच्या (सिमरन) ‘कम्मो कौर’ नावाच्या मावशीची भूमिका साकारली होती. चित्रपटात शाहरूख खानच्या (राज) वडिलांची म्हणजे अनुपम खेर यांची आणि हिमानींची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या क्लायमॅक्सच्या सीनमध्ये जवळपास सर्वच कलाकार एकत्र दिसतात, पण हिमानी शिवपुरी मात्र दिसत नाहीत. खरं तर त्या सीनमध्ये त्या असणार होत्या आणि अनुपम खेर यांच्याबरोबरच्या त्यांच्या लव्ह स्टोरीचा शेवटही दाखवला जाणार होता. पण, शूटिंगच्या अवघ्या दोन-तीन दिवसांआधीच त्यांचे पती ज्ञान शिवपुरी यांचे निधन झाले. त्यामुळे त्या शुटिंगला जाऊ शकल्या नव्हत्या.

माझ्यासाठी मोठा धक्का होता – हिमानी शिवपुरी

त्या कठीण प्रसंगाची आठवण सांगताना हिमानी म्हणाल्या, “सुदैवाने तेव्हा माझा भाऊ मुंबईत आला होता, पण तो लहान असल्याने त्याला मुंबईबद्दल जास्त माहीत नव्हतं. त्यामुळे अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था मलाच करावी लागली. मला काहीच कळत नव्हतं. कारण हा माझ्यासाठी मोठा धक्का होता आणि मोठी जबाबदारीही होती.”

ज्ञान शिवपुरी बाथरूममध्ये अचानक कोसळले, इमारतीतील डॉक्टरांना बोलावलं, त्यांनी तपासून मृत घोषित केलं. पण हिमानी यांचा यावर विश्वास बसला नाही आणि त्या पतीला घेऊन रुग्णालयात गेल्या होत्या. “ती माझी चूक झाली. कारण रुग्णालयात नेल्यामुळे शवविच्छेदन करावे लागले आणि या सर्व गोष्टी मला एकटीलाच सांभाळाव्या लागल्या,” असं हिमानी शिवपुरींनी सांगितलं.

हिमानी शिवपुरींनी सांगितला पोलीस स्टेशनमधील अनुभव

शवविच्छेदनाच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी हिमानी आणि त्यांच्या भावाला पोलीस ठाण्यात जावं लागलं होतं. तिथे त्यांना एक पोलीस अधिकारी भेटला, तो १९९३ मधील ‘हमराही’ या मालिकेतील त्यांच्या ‘देवकी भौजाई’ या भूमिकेचा मोठा चाहता होता. त्या घटनेची आठवण सांगताना हसत हिमानी म्हणाल्या, “माझ्या पतीचं निधन झालं होतं आणि तो पोलीस अधिकारी मला सांगत होता की त्याला माझी मालिका आणि भूमिका किती आवडते.” आता ही घटना त्यांनी हसत सांगितली असली तरी त्यावेळी मात्र त्या पोलिसाचा खूप राग झाला होता आणि त्यांच्या भावाने त्यांना शांत केलं होतं.

निर्मात्यांनी हिमानी शिवपुरींना काय म्हटलं होतं?

पतीच्या निधनानंतर सर्व गोंधळात आणि दुःखात हिमानी यांना ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या क्लायमॅक्सच्या शुटिंगला जायचंय, हेही लक्षात नव्हतं. “निर्मात्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, ‘तुमच्या पतीचं निधन झालंय हे आम्ही समजू शकतो. पण आमच्याकडे शाहरूख, अमरीश पुरी, फरिदा जलाल आणि इतर सर्व कलाकारांच्या तारखा आधीच ठरलेल्या आहेत. मॅम, आम्हाला हे शूटिंग करावंच लागेल, पण तुम्ही येऊ शकत नाही हे आम्ही समजू शकतो.’ त्या वेळी माझे या गोष्टींकडे फारसे लक्षही नव्हते,” अशी आठवण हिमानी शिवपुरी यांनी सांगितली.