Janhvi Kapoor Reveals Morped Photos Incident : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर ही सध्याच्या बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. स्टारकिड असल्याने ती अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. स्टारकिड असल्याचा जान्हवीला तिच्या करिअरमध्ये फायदा झाला आहे, पण यामुळे अभिनेत्रीला काही वाईट अनुभवदेखील आले आहेत. 

ग्लॅमरच्या जगात लहानाचे मोठे होत असताना प्रसिद्धी आणि लोकप्रियतेबरोबरच जान्हवीला काही कठीण अनुभव आले. ज्याबद्दल तिने याआधीही सांगितले आहे. अशातच अभिनेत्रीने पुन्हा एकदा नुकत्याच एका मुलाखतीत शाळेत असताना अश्लील साईटवरील मॉर्फ्ड फोटो पाहिल्याचे सांगितले.

“मुलं पॉर्न वेबसाइटवर माझा फोटो होता” – जान्हवी कपूर

राज शमाणीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना जान्हवीने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा ती अवघ्या १५ वर्षांची होती. शाळेत आयटी (IT) क्लास सुरू असताना तिच्या लक्षात आले की, वर्गातील काही मुले एका पॉर्न वेबसाइटवर काहीतरी पाहत आहेत. जेव्हा तिने हे पाहिले, तेव्हा तिला धक्काच बसला. कारण त्या साइटवर एका दुसऱ्याच शरीराला जान्हवीचा चेहरा लावून बनवलेला ‘डीपफेक’ फोटो होता. 

Award Banner

ती म्हणाली, “मला आठवतंय, मी आयटी क्लासमध्ये होते आणि माझ्या वर्गातील मुले ‘त्या’ साइटवर फोटो पाहत होती. त्यात माझाही फोटो होता.” जान्हवीने हा अनुभव अत्यंत क्लेशदायक असल्याचे सांगितले.

“आजही एआयने तयार केलेले फोटो…” – जान्हवी कपूर

तिने पुढे सांगितले की, त्या घटनेनंतरही परिस्थिती सुधारली नाही, उलट आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे ही समस्या अधिकच वाढली आहे. एआयच्या मदतीने बनवलेल्या बनावट फोटो आणि व्हिडीओमुळे चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. याबद्दल ती म्हणाली, “आजही माझे असे अनेक फोटो इंटरनेटवर आहेत, जे पूर्णपणे एआयने तयार केलेले आहेत. मी कधीच तसे कपडे घातले नाहीत किंवा तसे फोटो काढलेले नाहीत.”

जान्हवीने सांगितले की, काही न्यूज पेजेस जेव्हा तिने कधीही न घातलेल्या कपड्यांमधील तिचे एआय फोटो शेअर करतात, तेव्हा ते तिच्या प्रतिमेसाठी धोक्याचे ठरते. ती म्हणाली, “ते फोटो अशाप्रकारे शेअर केले जातात, जणू काही मीच ते पोस्ट केले आहेत. यामुळे लोकांच्या मनात एक वेगळीच प्रतिमा तयार होते. समजा, उद्या मी एखाद्या दिग्दर्शकाला अशाप्रकारची एखादी गोष्ट करण्यास नकार दिला, तर तो दिग्दर्शक माझे फोटो दाखवून म्हणू शकतो की, ‘पण तू तर आधी हे असं केलं आहेस ना’.”

“त्रास होतो, पण तक्रार करायला घाबरते” – जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने पुढे असेही सांगितले की, या गोष्टींचा तिला खूप त्रास होतो, पण याबाबत ती तक्रार करायला घाबरते. तिने म्हटले, “अर्थातच मला याचा त्रास होतो. पण मला वाटतं की, तक्रार करण्यासाठी माझा आवाज अजून तितका मोठा नाही. लोक असा विचार करतात की, तुम्हाला आयुष्यात इतकं काही मिळालं आहे तर थोडं सहन करा. तक्रार करू नका. त्यामुळे माझ्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतील का, अशी मला शंका वाटते.”