पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१९ सप्टेंबर) महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं आहे. ‘नारी शक्ती बंधन अधिनियम’ (महिला आरक्षण विधेयक) या नावाने हे विधेयक लोकसभेच्या पटलावर मांडलं आहे. दरम्यान हे विधेयक सादर झाल्यानंतर अनेक स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री कंगना रणौतने या विधेयकावर प्रतिक्रिया दिली आहे.




कंगना म्हणाली, “हा खूपच चांगला विचार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारमुळेच हे शक्य झाले आहे. त्यांच्या या विचारामुळे महिलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.” यावेळी कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले.
कंगना राणौत उघडपणे आपले मत मांडण्यासाठी ओळखली जाते. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर ती बेधडकपणे आपले मत व्यक्त करते. तिने अनेकवेळा पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. कंगनाची राजकारणातील आवड पाहून तिच्या राजकारणातील प्रवेशाबाबतही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सध्या तिचे संपूर्ण लक्ष चित्रपटांवर आहे. अभिनयासोबतच तिने दिग्दर्शनातही पाऊल ठेवले आहे.
हेही वाचा- “महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर केलं”, मल्लिकार्जुन खरगेंचा संसदेत दावा
करिअरबद्दल बोलायचे झाले तर कंगना रणौत सध्या तिच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार असून तिनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगनाबरोबर महिमा चौधरी, अनुपम खेर, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.