विद्या बालन, नसीरुद्दीन शाह आणि इमरान हाश्मी यांचा २०११ साली प्रदर्शित झालेला ‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट तुफान गाजला होता. प्रचंड विरोधानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर चांगला प्रतिसाद मिळाला होता. सिल्क स्मिता या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या जीवनावर या चित्रपटाची कथा बेतली होती. या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले. विद्या बालनच्या कामाचे कौतुकदेखील झाले मात्र या चित्रपटात विद्याच्या आधी धाकड गर्ल अर्थात कंगना रणौतला ही भूमिका विचारण्यात आली होती.
कंगना रणौतने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ती आता केवळ अभिनयातच नव्हे तर आता निर्मिती आणि दिग्दर्शनातदेखील उतरली आहे. कंगनाला ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटासाठी विचारण्यात आले होते. कंगनाने मागे टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने असं सांगितले की, “मला नाही वाटत मी विद्यापेक्षा ही भूमिका चांगली केली असती. तिने खूप छान पद्धतीने भूमिका केली होती. पण हो, कधी कधी मला वाटतं की मला त्या चित्रपटात क्षमता दिसली नाही.” अशी प्रतिक्रिया तिने दिली होती. कंगनाने नकार दिल्यानंतर ही भूमिका विद्या बालनने साकारली होती.
दरम्यान एकता कपूर बऱ्याच काळापासून या चित्रपटाच्या सिक्वेलची निर्मिती करण्याच्या विचारात आहे आणि या वर्षाच्या अखेरीस ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि एकता कपूर या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहेत. २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचीही चर्चा आहे.
कंगना मूळची हिमाचल प्रदेशची आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याबरोबरच ती यात माझे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.