बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने आजवर तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. याशिवाय तिच्या नृत्याचेही अनेक चाहते आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आपल्या अभिनय, डान्स आणि सौंदर्याने चर्चेत राहणारी कतरिना नुकतीच एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे आणि हे कारण म्हणजे ती मालदिवची ‘ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर’ झाली आहे.
मालदीवने पर्यटनाचे आकर्षण वाढवण्याच्या उद्देशाने अभिनेत्री कतरिना कैफला त्यांची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशन (एमएमपीआरसी) ने मंगळवारी याबद्दलची घोषणा केली. विशेष म्हणजे ही घोषणा पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी करण्यात आली आहे. यावेळी एमएमपीआरसीने कतरिना मालदीवची ब्रँड अॅम्बेसेडर असणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची भावना व्यक्त केली.
याविषयी एमएमपीआरसीचे व्यवस्थापकीय संचालक थोयिब मोहम्मद म्हणाले, “कतरिना कैफ आमची जागतिक ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून असणे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. जागतिक मनोरंजन उद्योगातील तिची प्रसिद्धी आणि लोकप्रियता आम्हाला जगभरातून, विशेषतः भारतातून अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यास निश्चितच मदत करेल.” यानंतर अभिनेत्रीने तिच्या ब्रँड अॅम्बेसेडर झाल्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी कतरिना कैफ आनंदाने तिच्या भावना व्यक्त करत म्हणाली, “मालदीव हे नैसर्गिक सौंदर्याचे प्रतिनिधित्व करते. हे एक असे ठिकाण आहे जिथे सुंदरतेसह शांतता मिळते. सनी साईड ऑफ लाईफचा चेहरा म्हणून माझी निवड झाल्याबद्दल मला अभिमान आहे. जगभरातील लोकांना मालदीव या निसर्गरम्य ठिकाणाचे आकर्षण आणि जागतिक दर्जाच्या ऑफर शोधण्यासाठी मदत करण्यास मी उत्सुक आहे.”
कतरिना केवळ अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी उद्योजिकादेखील आहे. तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत आणि याबद्दल तिला पुरस्कारही मिळवले आहेत. तिचं हे प्रभावी व्यक्तिमत्व लक्षात घेता मालदीवने तिला ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षी भारत आणि मालदीवमधील संबंध बिघडल्यानंतर, दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सौहार्दपूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२४ च्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाक्षद्वीप बेटांना भेट दिली आणि काही फोटो शेअर केली. या फोटोमुळे लाक्षद्वीपचं सौंदर्य उजळून आलं आणि लोकांनी ते मालदीवला पर्याय म्हणून बघायला सुरुवात केली. पण त्यानंतर मालदीवच्या सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली आणि अपमानास्पद टीका केली. तसंच भारताबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं.
या वक्तव्यांनंतर भारतीयांमध्ये सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेक भारतीय नागरिक, सेलिब्रिटींनी बॉयकॉट मालदीव असा हॅशटॅग वापरून मालदीवला न जाण्याचं आवाहन केलं. यानंतर झालेल्या वादामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर मोठा आर्थिक परिणाम झाला. अशातच कतरिनाची मालदिवची ‘ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणून निवड झाली आहे.