scorecardresearch

कतरिनाला पाहून प्रेक्षकांची उडणार घाबरगुंडी; या चित्रपटात दिसणार भूताच्या भूमिकेत

‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे.

कतरिनाला पाहून प्रेक्षकांची उडणार घाबरगुंडी; या चित्रपटात दिसणार भूताच्या भूमिकेत
कतरिना कैफ फोन भूत चित्रपट | katrina kaif phone bhoot film

बॉलिवूडमध्ये गेली काही वर्षं वेगवेगळे भयपट बनले आणि प्रेक्षकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला. ‘स्त्री’, ‘रूही’ अशा काही चित्रपटातून केलेला वेगळा प्रयत्न प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. आता पुन्हा एक असाच भयपट प्रेक्षकांची झोप उडवायला सज्ज आहे. एक्सेल एंटरटेनमेंटच्या बहुप्रतिक्षित हॉरर-कॉमेडी ‘फोन भूत’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये कतरीना कैफ भूताची भूमिका साकारताना दिसणार आहे. कतरीनाबरोबर या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

कतरिना, सिद्धांत आणि ईशान खट्टर अभिनित त्यांच्या फर्स्ट लूकसह त्यांच्या कास्टिंगबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता होती. ‘फोन भूत’ हा चित्रपट एक मजेशीर हॉरर-कॉमेडी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे आणि यामध्ये ही तीनही कलाकार वेगळ्याच भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असला तरी, एक मोठे कुतूहल चित्रपटातील भुताच्या पात्राबद्दल प्रेक्षकांमध्ये होते. मात्र आता याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे, या चित्रपटात कतरिना कैफ एका सुंदर अशा भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत आपण कतरीनाला चित्रपटांमध्ये फक्त ग्लॅमरस भूमिकेत पाहिलं असून, कतरिना पहिल्यांदाच पडद्यावर भूताच्या भूमिकेत दिसणार आहे.

आणखी वाचा : श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात नेसलेल्या साडीचा होणार लिलाव; या कारणासाठी दिग्दर्शिकेने घेतला निर्णय

या दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि कतरिनाला पडद्यावर अशा अनोख्या भूमिकेत पाहणे ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असेल. ‘फोन भूत’ हा कतरिनाचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट आहे, त्यामुळेदेखील रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. अलीकडेच, इंटरनेटद्वारे समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये, कतरीना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर सेटवर धम्माल करताना दिसले. शिवाय या तिघांनी ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमातही हजेरी लावली होती.

गुरमीत सिंग दिग्दर्शित आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटद्वारा निर्मित ‘फोन भूत’ ४ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. कतरिनाच्या या नव्या चित्रपटासाठी तिचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत. इतर भयपटांप्रमाणे या चित्रपटालाही प्रेक्षक पसंत करतील की नाही हे येणारा काळच ठरवेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या