Mandana Karimi on leaving India and Iran political crisis : अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त लष्करी हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण मध्यपूर्वेतील विविध देशांवर हल्ले करत आहे. अशातच आता, भारतात राहणारी इराणी अभिनेत्री मंदाना करीमी हिने भारत सोडून पुन्हा इराणला जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना मंदाना म्हणाली, “मला असं दिसतंय की भविष्यात इराण एक मुक्त राष्ट्र असेल, जिथे स्त्रियांना हवे तसे जगण्याचे, हवे ते कपडे घालण्याचे आणि हव्या त्या विद्यापीठात जाऊन शिक्षण घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. मला असा इराण पाहायचा आहे, ज्याचे मध्यपूर्वेतील इतर देशांशी चांगले संबंध असतील आणि इराण जगासाठी धोका नसेल तर मध्यपूर्वेच्या प्रगतीसाठी योगदान देणारा देश असेल. ज्या क्षणी ही राजवट संपल्याची घोषणा होईल, त्याच क्षणी मी तिथे निघून जाईन.”

मी बॅग भरली आहे, भारत सोडून जाणार

मंदाना करीमी पुढे म्हणाली, “मी माझी बॅग भरली आहे आणि मी भारत सोडून जाणार आहे. हाच माझा प्लॅनच आहे, कारण मला असं वाटतंय की आता माझं आणि भारताचं नातं संपत आलंय. भारत सोडून जाण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण आहे, कारण मी खूप लहान वयातच भारतात आले होते. भारताने मला सर्व काही दिलंय. माझं मॉडेलिंग आणि अभिनयाचं करिअर, लोकांचं प्रेम आणि इथे मिळालेले मित्र. पण, आता मला असं वाटतंय की भारतात माझा आवाज दाबला जात आहे.”

मंदाना करीमीने गमावले मित्र

इराणमधील सध्याच्या राजवटीविरुद्ध आंदोलनांमध्ये सहभागी झाल्यामुळे मुंबईतील अनेक मित्र गमावल्याला दावा मंदाना करीमीने केला आहे. “गेल्या दोन महिन्यांत मला मुंबईत खूप एकटं वाटतंय आणि घराची आठवण येतेय. माझे इथे खूप मित्र होते. पण दुर्दैवाने, मी निदर्शनांमध्ये सामील झाले आणि इराणबद्दल जाहीरपणे बोलल्यावर माझे अनेक मित्र माझ्यापासून दुरावले,” असं मंदाना म्हणाली.

भारताने माझा विश्वासघात केलाय

“मला वाटतं की भारताने माझा विश्वासघात केला आहे. भारताने मला जे द्यायचं होतं ते दिलं आहे. पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी लवकरच इराणला स्थलांतरित होणार, अशी मला आशा आहे,” असं मंदाना करीमीने सांगितलं.

मंदाना करीमीचे करिअर

मंदाना करीमी ही मुळची इराणची असून तिने आपल्या करिअरची सुरुवात एअर होस्टेस म्हणून केली होती. त्यानंतर मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती २०१० मध्ये भारतात आली. तिने ‘रॉय’ (२०१५), ‘भाग जॉनी’ (२०१५), ‘मैं और चार्ल्स’ (२०१५), ‘क्या कूल हैं हम ३’ (२०१६) आणि ‘थार’ (२०२२) यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मंदाना ‘बिग बॉस ९’ (२०१५) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. ती ‘इश्कबाज’ या मालिकेत आणि २०२२ मध्ये ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती.