Actress Mumtaz Reveals Her Fitness Secret : ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांनी ६०-७० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या मुमताज त्यांच्या फिटनेसमुळेही चर्चेत राहत असतात. वयाच्या पंचाहत्तरीतही त्या अगदी फिट आहेत.
मुमताज यांचा फिटनेस पाहून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे आजही कठीण जाते. अशातच मुमताज यांनी नुकतेच आपल्या आरोग्याचे गुपित सांगितले. त्यांची जीवनशैली, आहार, दररोजचा व्यायाम हा अक्षय कुमारने दिलेल्या सल्ल्यावर आधारित असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
‘असा’ असतो मुमताज यांचा रोजचा दिनक्रम
मुमताज म्हणाल्या, “मी संध्याकाळी काहीही खात नाही. एकदा अक्षय कुमारनेही मला हेच सांगितले होते की रात्री जेवू नकोस, तो स्वतःही हेच फॉलो करतो.” मुमताज दुपारी ४ नंतर काहीही खात नाहीत. थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच नाश्ता करतात. मधल्या काळात भूक लागलीच; तर त्या एखादे फळ खातात.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सकाळी उठल्यावर त्या दूध पितात. दुपारचे जेवण हे त्यांच्या दिवसभरातील मुख्य जेवण असते. दुपारच्या जेवणात त्या नॉनव्हेज किंवा एखाद्या भाजीबरोबर ज्वारी, बाजरीची भाकरी खातात. दुपारच्या जेवणानंतर त्या पुन्हा काहीही खात नाही. त्या म्हणाल्या की, “असा दिनक्रम पाळण्यासाठी जिद्द लागते, जी अनेक लोकांकडे नसते.” विकी लालवानी यांच्याशी झालेल्या संवादात मुमताज यांनी फिटनेसबद्दल सांगितले.
मुमताज यांनी सांगितले व्यायामाचे महत्त्व
मुमताज दररोज सुमारे ९० मिनिटे व्यायाम करतात, ज्यामध्ये वेट ट्रेनिंगचाही समावेश असतो. “मी ५ किलोचे वजन उचलते आणि पायांचे व्यायामही करते,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते फिटनेस म्हणजे केवळ डाएट किंवा व्यायाम नाही, तर ती एक शिस्त आहे. “मी मुमताज झाले कारण मी खूप कष्ट केले. कष्टाशिवाय आयुष्यात काहीही मिळत नाही,” असेही त्या पुढे म्हणाल्या.
देव आनंद यांनी मुमताज यांना दिलेला सल्ला
मुमताज यांनी यापूर्वी देव आनंद यांनी दिलेल्या एका सल्ल्याची आठवण सांगितली होती. देव आनंद तिला म्हणाले होते की, “वय हा केवळ एक आकडा आहे. तू नेहमी स्वतःचे केस आणि शरीर नीट राखले पाहिजे आणि तरुण दिसण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तू ९० व्या वर्षीही सुंदर दिसलीस, तर तुझा तेव्हाही बॉयफ्रेंड असू शकतो.” मुमताज आपल्या फिटनेससाठी आजही त्यांचा आणि अक्षय कुमारने दिलेला सल्ला पाळतात.
