ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना निलिमा अझीम (Neelima Azeem) यांचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखां आहे. निलिमा अझीम या एक प्रख्यात कथ्थक नृत्यांगना आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील तीन लग्नांची आणि त्यांच्या मुलांची नेहमीच चर्चा होत असते.

नीलिमा अझीम यांचा जन्म बिहारची राजधानी पाटण्यात झाला होता. नीलिमांचे वडील अन्वर अझीम हे पत्रकार आणि ज्येष्ठ लेखक होते. नीलिमाची आई खदिजा या चित्रपट निर्माते ख्वाजा अहमद अब्बास यांच्या नातेवाईक होत्या. नीलिमा यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती आणि त्यांनी लहान वयातच डान्स सुरू केला होता.

निलिमा यांचं बालपण व पहिलं लग्न

नीलिमा यांनी बिरजू महाराज यांच्याकडून शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ १५ वर्षांच्या नीलिमाची पंकज कपूरशी मैत्री झाली होती. जवळपास २ वर्षांनी दोघांनी १९७५ मध्ये लग्न केले. लग्नाच्या वेळी नीलिमा फक्त १७ वर्षांच्या होत्या आणि पंकज कपूर २१-२२ वर्षांचे होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर नीलिमा यांनी २५ फेब्रुवारी १९८१ मध्ये शाहिद कपूरला जन्म दिला. शाहिदच्या जन्मानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात दुरावा आला. साडेतीन वर्षांनंतर १९८४ मध्ये नीलिमा अझीम आणि पंकज कपूर यांनी घटस्फोट घेतला.

निलिमा अझीम-पंकज कपूर घटस्फोट

नीलिमा यांनी शाहिदला सोबत ठेवले आणि सिंगल मदर म्हणून त्याचे संगोपन करू लागल्या. यानंतर नीलिमा यांनी राजेश खट्टर यांच्याशी मैत्री झाली. दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी १९९० मध्ये लग्न केलं. १९९५ मध्ये नीलिमा आणि राजेश यांचा मुलगा ईशान खट्टरचा जन्म झाला. ईशान खट्टर हादेखील लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. निलिमा यांचं दुसरं लग्नही टिकलं नाही. ११ वर्षांच्या संसारानंतर नीलिमा आणि राजेश वेगळे झाले.

निलिमा अझीम यांचं दुसरं लग्न

२००१ मध्ये नीलिमा आणि राजेश खट्टर यांचा घटस्फोट झाला. यानंतर नीलिमा यांची सुफी गायक रझा अली खानशी मैत्री झाली. काही वर्षांच्या मैत्रीनंतर नीलिमा आणि रझा अली यांनी २००४ मध्ये लग्न केले. पण त्यांचे तिसरे लग्नही फार टिकू शकले नाही आणि २००९ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता नीलिमा आपल्या मुलांबरोबर राहतात. नीलिमांची दुसरे पती राजेश खट्टरबरोबर चांगली मैत्री आहे. निलिमा त्यांची दोन्ही मुलं शाहिद कपूर आणि ईशान खट्टरबरोबर वेळ घालवताना दिसतात.

निलिमा अझीम यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तीन लग्ने मोडल्यानंतरही त्यांनी कधी हार मानली नाही. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उत्तम करिअर घडवण्यासाठी खंबीर पाठिंबा दिला. तर शाहिद कपूरनेही अनेकदा आपल्या आईच्या संघर्षाबद्दल आणि तिने दिलेल्या संस्कारांबद्दल जाहीरपणे कृतज्ञता व्यक्त केली आहे.