Bollywood Actress Shares Dubai’s New Update : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबईत अडकली असल्याची माहिती समोर आली होती. अभिनेत्रीनं स्वत:च्या आपल्या सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती शेअर केली होती.
इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली. त्यामुळे तिथल्या विमानतळावर अनेक प्रवासी अडकले आहेत आणि या अडकलेल्या प्रवाशांत सोनलही होती. तिथल्या परिस्थितीबाबत तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आपण दुबईमध्ये अडल्याचं सांगितलं होतं. अशातच आता अभिनेत्रीनं पुढील अपडेट शेअर केली आहे.
दुबईमध्ये अडकल्यानंतर सोनलनं मायदेशी सुरक्षितपणे परतण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. आता सोनलनं सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे की, ती सुरक्षित आहे आणि दुबईतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
दुबईमध्ये अडकलेल्या सोनल चौहानची प्रतिक्रिया
रविवारी (१ मार्च) सोनलनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत चाहत्यांना सांगितलं की, ती दुबईमध्ये सुरक्षित आहे. स्थानिक प्रशासन सर्वांच्या सुरक्षेसाठी पूर्ण प्रयत्न करत आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच अफवा पसरवू नयेत, हेही तिनं नमूद केलं. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सोनल म्हणते, “मेसेज करून जे जे माझी विचारपूस करत आहेत, त्यांचे मनापासून आभार. सर्वांनाच मी उत्तर देऊ शकले नाही, याबद्दल माफी मागते. सध्या मी सुरक्षित आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.”

सोनल चौहानने नरेंद्र मोदींकडे मागितलेली मदत
पुढे सोनल म्हणाली, “घाबरण्याचं कारण नाही. दुबई हे जगातील सर्वांत सुरक्षित ठिकाणांपैकी एक आहे. प्रशासन सर्वांची काळजी घेत आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. कृपया कोणीही अफवा पसरवू नयेत. सर्वांच्याच सुरक्षेसाठी मी प्रार्थना करते.” याआधी तिनं शनिवारी “युद्धजन्य परिस्थितीत सर्व विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत आणि भारतात परत येण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाहीय. मला माझ्या मायदेशी सुरक्षितपणे परतण्यासाठी कृपया मदत करा”, अशी पोस्ट शेअर करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली होती.
दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेनं इराणमधील लष्करी ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती अधिक गंभीर झालीय. त्यानंतर काही देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
