Bollywood Actor Govinda : ९० च्या दशकातल्या बॉलीवूडच्या काही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे गोविंदा. आपल्या अभिनय आणि हटके डान्स स्टाईलनं त्यानं प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, नंतरच्या काळात त्याचे चित्रपट अपयशी ठरले आणि त्याचं स्टारडम कमी होऊ लागलं.
याचदरम्यान गोविंदा दिलेली वेळ पाळत नाही आणि सेटवर उशिरा येतो अशा चर्चासुद्धा होत होत्या. अनेक सहकलाकार व निर्मात्यांनी गोविंदाच्या उशिरा येण्याचे किस्से सांगितले आहेत. अशातच एका अभिनेत्रीनं गोविंदाची बाजू घेतली आहे. या अभिनेत्री म्हणजे सुधा चंद्रन.
गोविंदा अन् सुधा यांनी १९९२ मधील सुपरहिट चित्रपट ‘शोला और शबनम’मध्ये एकत्र काम केले होते. गोविंदा सेटवर उशिरा येत असत. या चर्चेबद्दल सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सुधा म्हणाल्या, “’शोला और शबनम’च्यावेळी ते (गोविंदा) नेहमी वेळेवर यायचे. डेव्हिड धवन यांच्या सेटवर ते कधीही उशिरा येत नसत.”
गोविंदा सेटवर उशिरा येण्याबद्दल सुधा चंद्रन म्हणाल्या…
त्या पुढे म्हणाल्या, “जे लोक म्हणतात की, ते उशिरा यायचे. त्यांनी लक्षात ठेवावे की, ते एकाच वेळी पाच-सहा चित्रपटांचे शूटिंग करत होते. त्यांनाही खाणे-पिणे आणि झोप आवश्यक होती. फक्त त्यांनाच दोष देणे योग्य नाही. निर्माते त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी रांगेत उभे असायचे. शेवटी तेसुद्धा माणूसच आहेत. थोडा उशीर होणं स्वाभाविक आहे.”
शेवटी सुधा म्हणाल्या, “लोकांनी त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या; पण चुका प्रत्येकाकडून होतात. जर त्यांना पुन्हा इंडस्ट्रीत यायचे असेल, तर त्यांनी काही गोष्टींचा विचार करायला हवा. सुनीता (गोविंदाच्या पत्नी) यांनी एक योग्य गोष्ट सांगितली की, काळानुसार बदलायला हवं. अमिताभ बच्चन यांनी ते खूप सुंदरपणे करून दाखवलं आहे. प्रत्येक कलाकारानं वेळेनुसार स्वतःला नव्यानं शोधायला हवं.”
उशिरा येण्याच्या चर्चांबद्दल स्वत: गोविंदा म्हणालेला…
दरम्यान, उशिरा येण्याच्या या चर्चांबद्दल स्वत: गोविंदानंसुद्धा प्रतिक्रिया दिली होती. काजोल व ट्विंकल यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या कार्यक्रमात, “मी सेटवर उशिरा जातो म्हणून मला बदनाम केलं गेलं. कोण दिवसाला पाच शिफ्टमध्ये काम करू शकेल? हे शक्यच नाहीये. हे होऊच शकत नाही. एखादा माणूस इतकं शूटिंग कसं करू शकतं? काही वेळा गोष्टी माझ्या हातात नसायच्या. जसं की ट्रॅफिक आणि इतर गोष्टी, ज्यामुळे मला उशीर व्हायचा. त्याबद्दल अनेकदा बातम्या यायच्या. एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यापेक्षा बॉलीवूडमधील लोकांनी त्याचा आदर केला पाहिजे.”
