Bollywood Actress On Govinda & Sunita Ahuja Relationship : ९० च्या दशकातला लोकप्रिय अभिनेता म्हणजे गोविंदा. विनोद आणि डान्सच्या हटके स्टाइलने त्यानं अनेक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनयाने चर्चेत राहणारा गोविंदा गेले काही दिवस त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. अशातच गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्याबद्दल प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीनं प्रतिक्रिया दिली आहे.
गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी काही दिवसांपासून जोर धरला होता. यादरम्यान, गोविंदावर अफेअरचे आरोपही होत राहिले आहेत. या चर्चांना स्वत: गोविंदानंसुद्धा उत्तर दिलं आहे. अशातच एका मुलाखतीत अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी गोविंदा व सुनीताबद्दल प्रतिक्रिया दिली.
सुनीता आहुजा गोविंदाबद्दल वक्तव्य करतात पण…
सिद्धार्थ कननशी साधलेल्या संवादात सुधा म्हणाल्या, “सुनीता वहिनी कधी कधी त्यांच्याविरोधात बोलतात, पण गोविंदा कधीच त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत. ते दोघे एकत्रच राहायला हवे, असं मला वाटतं. मी सुनीता यांना कधी भेटले नाही, पण गोविंदासाठी तरी त्यांनी पुन्हा एकत्र यावं, अशी माझी इच्छा आहे.”
याच मुलाखतीत सुधा यांनी गोविंदा आणि त्यांच्या आईबरोबरच्या खास नात्याबद्दलही सांगितलं. “आम्ही अनेक शो आणि दौरे एकत्र केले. प्रत्येक शोनंतर आम्ही रात्रभर गप्पा मारायचो. त्यांना त्यांच्या आईबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. ते म्हणायचे की आई गेल्यानंतरही त्यांना सेटवर तिचा आवाज ऐकू यायचा. काही नाती कधीही संपत नाहीत”, असं त्या म्हणाल्या.
पुढे सुधा यांनी मोठेपणा आणि उदार स्वभावामुळे गोविंदाचं नुकसान झाल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या, “सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी अनेक चित्रपट स्वीकारले. पण त्याच लोकांनी त्यांच्या विरोधात अफवा पसरवल्या. त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. ते सतत प्रवास करत होते. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. कुणीही गॉडफादर नसताना बाहेरून येऊन सुपरस्टार होता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ते भारतातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत.”
गोविंदाने इंडस्ट्रीत पुन्हा दमदार एन्ट्री करावी, अशी इच्छाही यावेळी सुधा यांनी व्यक्त केली. याबद्दल त्या “जर त्यांना पुन्हा इंडस्ट्रीत यायचे असेल, तर त्यांनी काही गोष्टींचा विचार करायला हवा. प्रत्येक कलाकाराने काळानुसार बदलायला हवं”, असं म्हणाल्या. दरम्यान, गोविंदा आणि सुधा यांनी १९९२ साली आलेल्या ‘शोला और शबनम’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे.
