Tabu Surname Story : बॉलीवूडमधील काही दर्जेदार अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तब्बू. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या तब्बूने अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोकळेपणाने सांगितलं आहे. अभिनेत्रीनं आपल्या वडिलांना भेटलं नसल्याचं आणि वडिलांचं आडनावही वापरत नसल्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. तब्बू फक्त तीन वर्षांची असताना तिचे आई-वडील वेगळे झाले आणि त्यानंतर वडिलांशी तिचा कसलाच संबंध राहिला नाही.

‘Rendezvous With Simi Garewal’ या कार्यक्रमात सिमी गरेवाल यांच्याशी बोलताना तब्बू म्हणालेली, “माझं बालपण खूप छान गेलं. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर मी माझ्या आजी-आजोबांबरोबर (आईच्या आई-वडिलांबरोबर) राहत होते. माझी आई शिक्षिका होती, त्यामुळे मी आजीबरोबर जास्त वेळ घालवायचे. आजी प्रार्थना करायची, पुस्तकं वाचायची आणि मी त्याच वातावरणात मोठी झाले.”

वडिलांबद्दल तब्बू स्पष्टपणे म्हणाली होती…

त्याच मुलाखतीत तब्बूने वडिलांना भेटण्याची इच्छा नसल्याचेही सांगितले. तसेच तिने ‘हाश्मी’ हे वडिलांचे आडनाव का वापरले नाही, याचेही कारण दिले होते. ती म्हणाली, “मी कधीच वडिलांचे आडनाव वापरले नाही. मला ते वापरणं महत्त्वाचं वाटलं नाही. माझं पूर्ण नाव तबस्सुम फातिमा असं होतं. शाळेत ‘फातिमा’ हेच माझं आडनाव होतं.”

ती पुढे म्हणालेली, “माझ्याकडे वडिलांच्या कोणत्याही आठवणी नाहीत. माझी बहीण कधीतरी त्यांना भेटली आहे, पण मला कधीच त्यांना भेटावंसं वाटलं नाही. मी जशी मोठी झाले आणि ज्या ज्या गोष्टी मला आयुष्यात मिळाल्या, त्यात मी समाधानी आहे.” तब्बू तीन वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले.

अविवाहित राहण्याबद्दल तब्बू म्हणाली होती…

तब्बूने अजूनपर्यंत लग्न केले नाहीय आणि तिने अनेक मुलाखतींमध्ये अविवाहित राहण्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे. २०१७ मध्ये हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती, “प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला याचा कधी त्रास झाला नाही. अविवाहित असणं किंवा विवाहित असणं हा खूप मोठा मुद्दा आहे, असं मला वाटत नाही. मी एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन हे लग्न किंवा त्यांना मुलं आहेत की नाहीत यावर करत नाही आणि लोक माझ्याबाबतीत तसं करत असतील, तर मला त्याची माहिती नाही आणि मला त्यात पडायचंही नाही.”

दरम्यान, तब्बूच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झाल्यास, ती लवकरच पुरी जगन्नाथ दिग्दर्शित, विजय सेतुपती यांच्यासोबतच्या एका चित्रपटात दिसणार आहे. तसेच प्रियदर्शन दिग्दर्शित हॉरर-कॉमेडी ‘भूत बंगला’ या चित्रपटात ती अक्षय कुमारबरोबर झळकणार असून हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.