अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांतील विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक जण तिथे अडकले आहेत. त्यात अनेक भारतीयांचासुद्धा समावेश आहे. आता सरकारच्या मदतीनं या भारतीयांना मायदेशी आणलं जात आहे.
अमेरिका आणि इस्रायल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यामुळे अनेक जण दुबईमध्ये अडकले आहेत. त्यात सेलिब्रिटींचासुद्धा समावेश होता. बॉलीवूड अभिनेत्री सोनल चौहान, ईशा गुप्ता दुबईत अडकले होते. पण, नुकत्याच त्या भारतात परतल्या आहेत. अशातच आता बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासुद्धा भारतात परतली आहे.
विमानानं भारतात येत असताना अभिनेत्रीनं स्वतःला भीती आणि असुरक्षित वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. उर्वशीनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक भावनिक व्हिडीओ शेअर केला, ज्यात ती डोळे पुसताना दिसली. तसेच तिनं तिच्या सुरक्षित प्रवासासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनंतीदेखील केली.
“अचानक मी खूप घाबरले” : उर्वशी रौतेला
ती म्हणाली, “विमानावर बसेपर्यंत मी ठीक होते… पण विमानात बसताच मला अचानक भीती वाटू लागली. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. हे असं का होतंय, मला ठाऊक नाही; पण अचानक मी खूप घाबरले.”
“प्रवासासाठी प्रार्थना करा” : उर्वशी रौतेला
“सध्या मला खूप काळजी वाटतेय. माझ्या सुरक्षित प्रवासासाठी तुम्ही प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थना सध्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्या या भावना व्यक्त करण्यानं तुम्हाला माझ्याबद्दल काळजी वाटत असेल, तर मला माफ करा”, असं ती चाहत्यांना म्हणाली.
उर्वशी कुवेतमध्ये तिच्या काही कामानिमित्त गेली होती. पण, मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीनंतर तिला तिथून सुटका करून भारतात आणण्यात आले. सध्या उर्वशी मुंबईत पोहोचली आहे. तिनं शहरातून जाताना कारमधून एक छोटा व्हिडीओदेखील पोस्ट केला आहे. त्यामुळे ती भारतात सुखरूप पोहोचल्याचं समजत आहे.

गेल्या आठवड्यात ईशा गुप्ता भारतात सुखरूप परतली. त्याबद्दलची माहिती तिनं आपल्या सोशल मीडियाद्वारे दिली. त्या परिस्थितीत तिथे राहणं खूप कठीण होतं, असं तिनं सांगितलं. तसेच तिनं भारत आणि यूएई सरकारच्या मदतीनं भारतात सुखरूप परतल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. त्याचप्रमाणे दुबईमध्ये अडकलेल्या अभिनेत्री सोनल चौहानही सुरक्षितपणे भारतात परतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अशातच आता उर्वशीसुद्धा पुन्हा भारतात परतली आहे
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संयुक्त हल्ला केला. त्यानंतर इराणनं मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर हल्ले केले. त्यामुळे हवाई मार्ग बंद झाले; पण आता हळूहळू भारतीय आपल्या देशांत परतत आहेत.
