Bollywood Actress On Kissing Scenes : मनोरंजन क्षेत्रात काम करताना कलाकारांना अनेकदा काही वाईट घटनांना सामोरे जावे लागते. त्यात अभिनेत्रींच्या वाटेला तर असे विचित्र प्रसंग अधिक येत असतात. प्रत्यक्षात त्यांना आधी एक सांगितलं जातं, पण शूटिंगच्यावेळी मात्र त्यांना काहीतरी वेगळंच करायला सांगितलं जातं. असंच काहीसं एका बॉलीवूड अभिनेत्रीबरोबर घडलं होतं, ही अभिनेत्री म्हणजे झरीन खान.
झरीन खानने २०१० मध्ये सलमान खानच्या ‘वीर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला कतरिना कैफसारखी दिसणारी अभिनेत्री म्हणून तिची चर्चा झाली, पण पुढे ‘हाऊसफुल २’ आणि ‘हेट स्टोरी ३’ यांसारख्या हिट चित्रपटांमुळे तिने स्वतःची ओळख निर्माण केली. मात्र, २००६ च्या ‘अक्सर’ चित्रपटाचा सीक्वल असलेल्या ‘अक्सर २’ मुळे ती मोठ्या वादात अडकली.
झरीन खानने याआधी अनेकदा या चित्रपटाच्यावेळी तिला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे. अशातच तिने पुन्हा याबद्दल सविस्तर सांगितले. Mammoth Media Asia या पूजा भट्टच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तिने सांगितले की, हेट स्टोरी ३ केल्यानंतर इंडस्ट्रीमधील अनेक लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. ती म्हणाली, “हेट स्टोरी केल्यानंतर अनेक लोक मला कमी लेखू लागले. काही जण म्हणायचे, ‘मला अभिनय येत नाही, म्हणूनच मी बोल्ड सीन करते’.”
प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये किसिंग आणि बोल्ड सीन…
झरीनच्या म्हणण्यानुसार, दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी तिला वेगळीच गोष्ट सांगितली होती. महादेवन यांनी सांगितले होते की हा चित्रपट ‘हेट स्टोरी’ सारखा बोल्ड नसेल, तर तो एक ‘थ्रिलर’ चित्रपट असेल. मात्र, शूटिंगच्या वेळी प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये किसिंग सीन किंवा बोल्ड कपडे घालण्याची सक्ती केली जाऊ लागली.
ब्रा घालून सीन करावा लागेल असे सांगितले जायचे
ती म्हणाली, “त्यांनी खूप छान इंग्रजीत स्क्रिप्ट समजावून सांगितली आणि म्हणाले की आपण ‘हेट स्टोरी’सारखा चित्रपट करत नाही, तर एक वेगळ्या प्रकारचा ‘नोइर’ जॉनरचा चित्रपट बनवत आहोत. त्यामुळे मला वाटले की प्रोजेक्ट वेगळा असेल. सेटवर पोहोचल्यानंतर जवळपास प्रत्येक सीनच्या शेवटी किसिंग सीन असायचा किंवा अचानक मला ब्रा घालून सीन करावा लागेल असे सांगितले जायचे.”
झरीनने स्पष्ट केले की तिला बोल्ड सीन करण्याबद्दल काहीच अडचण नव्हती, पण तिला चित्रपटाबद्दल वेगळी माहिती देण्यात आली होती. ती म्हणाली, “मी दिग्दर्शकांना सांगितले की मला असे सीन करण्यास हरकत नाही, पण तुम्ही मला आधी वेगळंच सांगितलं. ‘हेट स्टोरी’ चालली म्हणून आता तुम्ही असे सीन वाढवत आहात, हे योग्य नाही.” निर्मात्यांना जवळपास प्रत्येक सीनमध्ये बोल्ड आणि किसिंग सीन्स हवे होते.
सगळ्या वादांनंतरही झरीनने चित्रपट पूर्ण केला. कारण निर्मात्यांचे पैसे अडकू नयेत असे तिला वाटत होते. ती म्हणाली, “मला माहित आहे की लोकांचे पैसे गुंतलेले असतात, त्यामुळे मी नेहमी समजुतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.”
वाद इतका वाढला की झरीनला तिच्या स्वतःच्या चित्रपटाच्या प्रीमियरला बोलावण्यात आले नाही. मीडियामध्ये तिला ‘अप्रोफेशनल’ ठरवण्यात आले. झरीनने स्पष्ट केले की, निर्मात्यांचे पैसे वाया जाऊ नयेत म्हणून तिने शांत राहून चित्रपट पूर्ण केला, पण तरीही तिच्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवण्यात आल्या.
या वादावर प्रतिक्रिया देताना दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी यापूर्वी एका मुलाखतीत आपले मत मांडले होते. किसिंग सीनबद्दल बोलताना ते म्हणाले, “काही किस सीन असले म्हणून चित्रपट अश्लील होत नाही. आजकाल अनेक चित्रपटांमध्ये असे सीन असतात, अगदी करण जोहर यांच्या चित्रपटांतही. संपूर्ण चित्रपट झरीनच्या पात्राभोवती फिरतो. झरीनने पूर्ण शूटिंग आणि डबिंग आनंदाने केले होते, मग आताच ती असे का बोलतेय हे मला समजत नाही.”
