बॉलीवूड अभिनेता इम्रान खानने कर्जत इथे घर बांधले आहे. त्याचे हे घर सामान्य लक्झरी हॉलिडे होमपेक्षा खूप वेगळे आहे. झाडं आणि टेकड्यांच्या मधोमध असलेल्या या घराला मोठ्या खिडक्या आहेत, ज्यातून घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश येतो आणि सभोवतालच्या हिरवेगार सौंदर्याचा नजारा दिसतो. घराच्या आतील भागात मोकळी जागा आहे. घरात लाइट रंगाची फरशी आणि साधी फिनिशिंग आहे. इम्रानने वर्षभर सूर्याची स्थिती, परिसराची रचना आणि बदलत्या ऋतूंचा अभ्यास केल्यानंतर हे घर स्वतः डिझाइन केलं आहे.
इम्रानने २०२४ मध्ये पहिल्यांदा या घराचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यावरून त्याने हे घर बांधण्यासाठी घेतलेली मेहनत आणि घरासंदर्भातील त्याचा विचार स्पष्ट दिसून येतो. या घराला उंच, उतार असलेले छत आहे. तसेच घरात लाकडी खांब वापरण्यात आले आहेत. त्याचबरोबर घरात बाहेरच्या बाजूने उघडणाऱ्या मोठ्या काचेच्या खिडक्या आहेत. एका खोलीतील मोठी खिडकी थेट झाडांच्या दिशेने आहे, तर दुसऱ्या खोलीतील काचेचे स्लायडिंग दरवाजे लाकडी डेकवर उघडतात.
बेडरूममध्ये अनेक बाजूंना मोठ्या खिडक्या आहेत, ज्यामुळे आत भरपूर सूर्यप्रकाश येतो. एका भिंतीवर लाकडी युनिट आहे. खोलीत फक्त एक साधा पलंग आणि एक लाउंज चेअर आहे. घरात अनावश्यक फर्निचर किंवा फार सजावट केलेली नाही. फक्त गरजेच्या वस्तू आहेत.

हे घर झाडांनी वेढलेल्या एका उतार जमिनीवर बांधलंय. घराची रचना जमिनीच्या आकारानुसार करण्यात आली असून. दगडाचा पाया, विटांच्या भिंती आणि घरावत पत्रे आहेत. घराभोवतीच्या मोकळ्या जागांमुळे हे घर निसर्गाचाच एक भाग वाटतं.
इम्रान खानने स्वतः डिझाईन केलं घर
२०२४ मधील पोस्टमध्ये, इम्रानने सांगितलं होतं की, त्याने वास्तुकलेचं कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही, तरीही त्याने हे घर स्वतः डिझाइन केलं आहे. तो स्वतः ३डी मॉडेलिंग शिकला आणि डिझाइन फायनल करण्यापूर्वी वर्षभर या जमिनीचा अभ्यास केला. “तर… गेल्या काही वर्षांत मी केलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे घर बांधणं. मी काही चित्रपटांमध्ये आर्किटेक्टची भूमिका साकारली असली, तरी माझ्याकडे याचं कोणतेही औपचारिक शिक्षण किंवा कौशल्य नाही. पण मला नवनवीन गोष्टी शिकायला आणि प्रयोग करायला आवडतात!”

ही जागा खडकाळ आहे. तसेच ओढा जवळ असल्याने इम्रानला एखादा आलिशान व्हिला बांधायचा नव्हता, तर निसर्गाचा आनंद घेता येईल असं साधं घर बनवायचं होतं. घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी २०२१ मध्ये इम्रानने वर्षभर तिथे जाऊन सूर्योदय-सूर्यास्त, पावसाळ्यातील ओढ्यांचा प्रवाह आणि बदलत्या ऋतूंचा अभ्यास केला, जेणेकरून घरात योग्य प्रकाश आणि वातावरण राहील. कोणत्याही आर्किटेक्टची मदत न घेता त्याने स्वतः ‘३डी मॉडेलिंग’ सॉफ्टवेअर शिकून घराचे डिझाइन तयार केले. त्याने हे काम कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या मदतीने पूर्ण केले.

इम्रानने घर बांधण्यासाठी आजूबाजूच्या गावांमधील घरांमध्ये सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या पद्धती वापरल्या. पारंपरिक काँक्रीट स्लॅब वापरण्याऐवजी, त्याने कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या मदतीने दगडाचा पाया, एकमजली विटांच्या भिंती, स्टीलचे रुफ बीम आणि इन्सुलेटेड रुफिंग शीट्सचा वापर केला. हे घर बांधण्यासाठी वेळ लागला, पण घेतलेली मेहनत सार्थ ठरली. स्वतः घर बांधल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात विकले जाणारे रेडीमेड व्हिला विकत घेण्यापेक्षा खूप कमी खर्च आला.

इम्रान खानची साधी लाइफस्टाइल
इम्रानने आपले कर्जतचे घर ज्या पद्धतीने डिझाइन केलंय, त्यावरून त्याच्या जगण्यातला साधेपणा दिसून येतो. अलिकडच्या काही वर्षांत, इम्रान फक्त गरजेपुरत्या वस्तूंचा वापर करून जगतो. तो लक्झरी लाइफस्टाइलवरील अनावश्यक खर्च टाळतो. स्वतःचे घर बांधण्याबरोबर इम्रानने आपल्या गॅरेजमधील सर्व महागड्या गाड्या विकल्या आणि स्वतःची एक जुनी कार दुरुस्त करून ती वापरतोय.
इम्रान खान अवंतिका मलिकापासून घटस्फोट घेतल्यानंतर त्याच्या पाली हिल येथील बंगल्यातून एका साध्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाला. तिथे गेल्यावर त्याला ज्या वस्तू हव्या होत्या, त्या त्याने विकत आणल्या. इम्रानच्या घरात कोणीच मदतनीस नाही. तो स्वतःची सगळी कामे स्वतः करतो. त्याच्या घरात तीन वेळच्या जेवणाच्या फक्त ३ प्लेट्स आहेत. दरम्यान, इम्रान सध्या अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.
