O’Romeo Collection-Assi Box Office Collection: बॉलीवूडमध्ये सध्या एकापेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामध्ये मराठी, हिंदी, तसेच दाक्षिणात्य सिनेमांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिद कपूर व तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ओ रोमिओ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

त्याबरोबरच ‘अस्सी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तापसी पन्नूची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. त्याबरोबरच सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांचा ‘दो दीवाने एक शहर में’ हा रोमँटिक सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमांच्या आधी प्रदर्शित झालेले ‘बॉर्डर २’ व ‘ मर्दानी ३ हे सिनेमेदेखील अजूनही थिएटरमध्ये उपलब्ध आहेत. आता कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे, तेजाणून घेऊ…

‘दो दीवाने शहर में’

दो दीवाने शहर में या चित्रपटात शशांक शर्मा आणि रोशनी श्रीवास्तव यांची गोष्ट पाहायला मिळते. जगासाठी शशांक आणि रोशनी यशस्वी आहेत. पण, खरं तर त्यांच्यात आत्मविश्वास कमी असल्यामुळे त्यांना विविध गोष्टींना सामोरे जावे लागते.

२० फेब्रुवारी २०२६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सॅल्कनिकनुसार, या सिनेमाचे बजेट ३० कोटी इतके आहे. आता मंगळवारी या चित्रपटाने ३९ लाखांची, तर पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर ५.१९ कोटींची कमाई केली आहे.

अस्सी

अस्सी या सिनेमाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. हा कोर्टरूम ड्रामा आहे. तापसी पन्नू हिने यामध्ये वकिलाची भूमिका साकारल्याचे दिसत आहे. हा सिनेमादेखील २० फेब्रुवारीला प्रदर्शित झाला आहे.

अस्सी या सिनेमाचे बजेट जवळजवळ ३० कोटी इतके आहे. चित्रपटाने मंगळवारी ५५ लाखांची कमाई केली. ‘अस्सी’ने आतापर्यंत एकूण ५.४५ कोटींची कमाई केली आहे.

ओ रोमिओ

ओ रोमिओ हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. विशाल भारद्वाज दिग्दर्शित या चित्रपटात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत.

समोर आलेल्या रिपोर्टनुसार ‘ओ रोमिओ’ने बॉक्स ऑफिसवर मंगळवारी १.१७ कोटीची कमाई केली. १३ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने भारतात ५८.५७ कोटींची आणि जगभरात ९१ कोटींची कमाई केली आहे.

‘बॉर्डर २’ने ३३ दिवसांत भारतात ३२६.५१ कोटींची, तर जगभरात ४४६ कोटींची कमाई केली आहे. राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मर्दानी ३’ने आतापर्यंत भारतात एकूण ४८.१५ कोटींचीआणि जगभरात ७१.३० कोटींची कमाई केली आहे.