AR Rahman Communal Bias Remark : संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आजवर त्यांच्या अनेक गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांच्या गाण्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या गाण्यांनी चर्चेत राहणारे रेहमान त्यांच्या विविध वक्तव्यांनीसुद्धा चर्चेत येत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी त्यांनी सांप्रदायिक घटकांमुळे काम मिळत नसल्याचं म्हटलं होतं.
रेहमान यांच्या वक्तव्यांवर कंगना रणौत, जावेद अख्तर, अनूप जलोटा व गायक शान यांसारख्या अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता बॉलीवूडचे संगीतकार सलीम मर्चंटने प्रतिक्रिया दिली. तसेच त्याने रेहमान यांच्या वक्तव्याशी असहमत असल्याचंसुद्धा म्हटलं.
नुकत्याच एका मुलाखतीत सलीमनं सांगितलं की, रेहमान सध्या भारतीय सिनेमातील सर्वांत मोठ्या ‘रामायण’ या चित्रपटाच्या संगीताचं काम करीत आहेत. त्यामुळे जर खरोखरच इंडस्ट्रीत सांप्रदायिक भेदभाव असता, तर रेहमान यांनी इतक्या मोठ्या चित्रपटासाठी संगीत दिलं नसतं.
ए. आर. रेहमान यांच्याबद्दल सलीम मर्चंटचं वक्तव्य
IANS ला दिलेल्या मुलाखतीत सलीम म्हणाला, “सांप्रदायिक भेदभाव आहे असं मला तरी वाटत नाही. रेहमान यांनी जे म्हटलं, त्याचा मी आदर करतो. कदाचित ते त्यांच्या अनुभवावरून बोलले असतील. पण माझ्या मते तरी असं काही नाही.”
“भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या चित्रपटांपैकी एक आणि हिंदू महाकाव्यावर आधारित असलेल्या ‘रामायण’चं संगीत जर रेहमान करत असतील, तर इंडस्ट्रीत सांप्रदायिक भेदभाव आहे, असे मला वाटत नाही. मात्र, हे माझे वैयक्तिक मत आहे. रेहमान यांनी तसं वक्तव्य करण्याची त्यांची काही वेगळी कारणं असू शकतात”, असं सलीम म्हणाला.
सांप्रदायिक भेदभावाबद्दल ए. आर. रेहमान म्हणालेले…
दरम्यान, BBC Asian Network ला दिलेल्या मुलाखतीत रेहमान म्हणाले होते, “गेल्या आठ वर्षांत सत्ताबदल झाला आणि आता जे लोक सर्जनशील (क्रिएटिव्ह) नाहीत, त्यांना निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आहे. हा बदल स्पष्टपणे दिसत नाही; पण तो अप्रत्यक्ष पद्धतीनं समजतो. कदाचित हे सांप्रदायिक कारणही असू शकतं.” त्यांच्या या विधानाची बरीच चर्चा झाली. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करण्यात आल्या.
रेहमान यांच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, नुकतंच त्यांनी ‘गांधी टॉक्स’ या चित्रपटाचं संगीत केलं. सध्या या चित्रपटातील सगळीच गाणी व्हायरल आहेत. तसेच ते बहुप्रतीक्षित ‘रामायण’ चित्रपटाचं संगीतसुद्धा करत आहेत. या चित्रपटासाठी, तसेच चित्रपटातील गाण्यांची सर्वजण वाट पाहत आहेत.
