David Dhawan Reveals Why He Did Not Work With Shah Rukh Khan : ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘पार्टनर’, ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘जुडवा’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ यांसारखे अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजे डेव्हिड धवन. डेव्हिड धवन यांनी आपल्या चित्रपटांमधून आजवर प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अनेकांना त्यांनी आपल्या चित्रपटांमधून ओळख आणि लोकप्रियता मिळवून दिली.
आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत डेव्हिड धवन यांनी सलमान खान, गोविंदा, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांसारख्या अनेक स्टार्सबरोबर काम केलं आहे. पण त्यांनी बॉलीवूडच्या एका अभिनेत्याबरोबर आजवर एकदाही काम केलेलं नाही आणि याचं कारण त्यांनी स्वत:च सांगितलं आहे. कोण आहे हा अभिनेता? चला जाणून घेऊ…
डेव्हिड धवन यांनी बॉलीवूडच्या अनेक कलाकारांबरोबर काम केलं असलं, तरी त्यांनी एका अभिनेत्याबरोबर त्यांनी अजूनही काम केलेलं नाही. हा अभिनेता म्हणजे, शाहरुख खान. डेव्हिड धवन यांनी आजवर शाहरुख खानबरोबर कधीच काम केलेले नाही. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी यामागचे नेमके कारण स्पष्ट केले.
सहा वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर डेव्हिड धवन ‘हाय जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते मुलाखती देत आहेत. अशातच एका मुलाखतीत त्यांनी शाहरुखबरोबर काम न करण्याबद्दल खुलासा केला.
शाहरुख खानबरोबर काम न करण्याबद्दल डेव्हिड धवन काय म्हणाले?
शाहरुख खानबरोबर आजवर कधीच काम का केले नाही, असे डेव्हिड धवन यांना विचारण्यात आले. या प्रश्नाचे उत्तर देत ते म्हणाले, “असं काही नाहीये की, मला त्याच्याबरोबर (शाहरुखबरोबर) काम करायचं नव्हतं. आम्ही एकत्र चित्रपट करण्याचा विचार करत होतो, पण त्या काळात मी खूप व्यग्र असायचो. माझ्या हातात एकाच वेळी दोन-दोन चित्रपट असायचे, त्यामुळे वेळ काढणं कठीण व्हायचं. पण हो, आम्ही एकत्र काम करण्याच्या विचारात नक्कीच होतो.”
“मी ठरावीक कलाकारांबरोबरच काम करेन, असं…” – डेव्हिड धवन
हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार ते पुढे म्हणाले, “मी ठरावीक कलाकारांबरोबरच काम करेन, असं कधीच ठरवलं नव्हतं. गोविंदा, सलमान आणि संजय दत्त यांच्याबरोबर माझं चांगलं जमलं आणि एकामागून एक चित्रपट होत गेले. पण शाहरुखबरोबरही लवकरच काम करणार आहे.”
दरम्यान, डेव्हिड धवन यांच्या आगामी ‘हाय जवानी तो इश्क होना है’ चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, या चित्रपटात त्यांचा मुलगा (वरुण धवन) हा मुख्य भूमिकेत आहे. वरुण धवन आणि डेव्हिड धवन हे दोघे या चित्रपटानिमित्त चौथ्यांदा एकत्र काम करत आहे. या चित्रपटात वरुणबरोबरच मृणाल ठाकूर, पूजा हेगडे, मौनी रॉय, राकेश बेदी आणि मनिष पॉल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘हाय जवानी तो इश्क होना है’ हा चित्रपट आधी ४ जून रोजी प्ररदर्शित होणार होता, मात्र ‘टॉक्सिक’ चित्रपटाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी आता तो २२ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
