Bollywood Director On Govinda बॉलीवूड अभिनेता गोविंदा हा त्याच्या अभिनयाबरोबरच आणखी एका सवयीसाठी ओळखला जायचा, ती सवय म्हणजे सेटवर उशिरा येणे किंवा कधीकधी शूटिंगला न पोहोचणे. गोविंदाच्या या सवयीमुळे निर्माते आणि सह-कलाकारांना प्रचंड त्रास व्हायचा. त्याच्या या उशिरा येण्याचे अनेक किस्से आहेत. हे किस्से त्याच्याच काही सहकलाकारांनी सांगितले आहेत. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांनीसुद्धा त्याच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दल सांगितलं.

दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी ‘भागम भाग’ चित्रपटासाठी गोविंदाला साईन केले, तेव्हा त्यांच्या मनातही गोविंदाच्या वेळेत न येण्याबाबत भीती होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गोविंदाने त्यांना पूर्ण सहकार्य केले आणि तो शूटिंगसाठी वेळेवर हजर राहिला.

“जर तू वेळेवर येऊ शकत नसशील तर…”

गोविंदाच्या उशिरा येण्याच्या सवयीबद्दल प्रियदर्शन म्हणाले, “मी गोविंदाला आधीच स्पष्टपणे सांगितले होते की, तुझ्याबद्दल मी बरंच काही ऐकलं आहे. त्यामुळे जर तू वेळेवर येऊ शकत नसशील, तर कृपया हा चित्रपट करू नकोस. पण तो रोज वेळेवर सेटवर हजर असायचा. मला त्याच्याबरोबर काम करताना खरच खूप मजा आली.”

“गोविंदा आणि सलमानला सकाळी ५ वाजता…”

‘मॅशबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी गोविंदाबद्दल सांगितले, “मला जेव्हा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला, तेव्हा एका मुलाखतीत मला विचारण्यात आले की, हे तुमचे सर्वात मोठे यश आहे का? मी म्हणालो, नाही! गोविंदा आणि सलमान खानला सकाळी ५ वाजता सेटवर बोलावून चित्रपट वेळेत पूर्ण करणे, हे माझे सर्वात मोठे यश आहे.” तसंच प्रियदर्शन पुढे गमतीने म्हणाले, “गोविंदाला वेळेवर सेटवर आणणे आणि त्याच्याकडून वेळेत काम करून घेणे, हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे.”

गोविंदाचा असाच आणखी एक किस्सा आहे. ‘हम’ चित्रपटाच्या शुटींगवेळी दिग्दर्शक मुकुल आनंद यांना सूर्योदयाचा एक शॉट घ्यायचा होता. त्यासाठी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत सारखे दिग्गज कलाकार पहाटेपासून सेटवर तयार असायचे, पण गोविंदा गायब असायचा. सलग तीन दिवस गोविंदा न आल्यामुळे तो शॉट रद्द करावा लागला होता. चौथ्या दिवशी विनंती केल्यानंतर तो सेटवर आला. तो येत नसल्यामुळे अनेकांना त्याची वाट पाहत ताटकळत राहावे लागले होते.

गोविंदाच्या मॅनेजरने मात्र हे सर्व दावे फेटाळून लावले. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मॅनेजरने स्पष्ट केले की, “गोविंदाच्या शूटिंगचे वेळापत्रक नेहमीच व्यवस्थित आखलेले असायचे. जर कधी शूटिंगला उशीर झाला असेल, तर तो केवळ त्याच्या प्रकृतीच्या कारणामुळे किंवा प्रवासातील काही अपरिहार्य अडचणींमुळे झाला असावा.”

यावर स्वत: गोविंदानेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. “इंडस्ट्रीत प्रत्येकाला कधी ना कधी वाईट ठरवले जाते. अमिताभ बच्चन किंवा राजेश खन्ना यांच्यासारख्या दिग्गजांच्या बाबतीतही असे घडले होते. हा एक काळ असतो, जो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. तुम्ही त्यातून कसे बाहेर पडता, हाच खरा खेळ आहे”, असे त्याने म्हटले.