Bollywood Director Sanjay Gupta Remarriage Love Story: मुंबई अंडरवर्ल्डवर गाजलेले चित्रपट बनवणारे प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे ३० ऑक्टोबर रोजी ५७ व्या वर्षी राहत्या घरी दुर्दैवी निधन झाले. स्वयंपाकघराच्या फरशीवर पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुराधा लेखी यांच्यासोबतची एक भावूक प्रेमकहाणी समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या ६ वर्षांत घटस्फोट झाल्यानंतरही संजय गुप्ता यांनी अनुराधा यांची मनधरणी केली आणि अखेर २००९ मध्ये त्यांच्याशीच पुन्हा लग्नगाठ बांधली होती.

घटस्फोटानंतर अनुराधा लेखीशी पुन्हा केलं होतं लग्न

संजय गुप्ता व अनुराधा लेखी यांची भेट कॉलेजच्या दिवसांत झाली होती. दोघे प्रेमात पडले आणि बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. त्यानंतर त्यांनी २२ वर्षांच्या अनुराधा यांच्याशी १८ ऑगस्ट १९९७ रोजी लग्न केलं होतं. मात्र, अवघ्या ६ वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला आणि अनुराधा पुण्याला आपल्या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर अनेक वर्षे संजय यांना अनुराधा यांची उणीव भासत होती. अखेर त्यांना अनुराधांची मनधरणी करण्यात यश आलं आणि २००९ मध्ये त्यांनी अनुराधा यांच्याशी पुन्हा लग्न केलं.

bollywood-director-sanjay-gupta-wife-anuradha-lekhi
संजय गुप्ता आणि अनुराधा लेखी; घटस्फोटानंतर ६ वर्षांनी पुन्हा थाटला होता संसार

घटस्फोटाबाबत संजय गुप्ता काय म्हणाले होते?

दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी एका मुलाखतीत आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितलं होतं की, दोघे वेगळे झाल्यानंतरही संजय आपल्या पत्नीला स्टॉक करायचे. “मी ती ५ वर्षे तिला स्टॉक करत होतो, ती माझी सोलमेट आहे.” आयुष्यातील अनेक चढ-उतारांनंतरही अनुराधा यांच्याबरोबर राहण्याची त्यांची इच्छा होती. ते म्हणाले होते, “मी करिअरमध्ये यश अनुभवलं, जीवघेण्या अपघातातून वाचलो. ॲसिड फॅक्टरी, पंख आणि द ग्रेट इंडियन बटरफ्लाय यांसारखे चित्रपट रिलीजसाठी तयार होते. याच वर्षात आईलाही गमावलं. थोडक्यात सांगायचं तर, आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण या सर्वांच्या मध्ये अनुसोबत राहण्याची माझी इच्छा कायम होती.”

अनुराधा लेखी यांनी २०२४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत घटस्फोटासाठी दोघांनाही जबाबदार धरलं होतं. “घटस्फोट आम्हा दोघांमुळेच झाला होता, कारण एका टप्प्यावर मला असं झालं की बास, आता पुरे,” असं अनुराधा यांनी सांगितलं होतं. घटस्फोटानंतरही दोघे संपर्कात होते. “दर सहा महिन्यांनी संजय मला म्हणायचे की आपण पुन्हा एकत्र येऊया.” अखेर घटस्फोटानंतर सहा वर्षांनी त्यांनी पुन्हा एकमेकांशीच लग्न केलं.