Why Unfreedom was Banned in India : भारतीय चित्रपटसृष्टीत अनेकदा कथांपेक्षा चित्रपटातील ‘बोल्ड कंटेंट’चीच अधिक चर्चा होते. सामाजिक-राजकीय मुद्दे, लैंगिकता, नातेसंबंध आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या संवेदनशील विषयांवर बोट ठेवणाऱ्या चित्रपटांवर नेहमीच सेन्सॉर बोर्डाकडून कात्री फिरवली जाते. असाच एक वादग्रस्त चित्रपट म्हणजे ‘अनफ्रीडम’ (Unfreedom) होय. २०१५ सालच्या या चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊ दिलं नव्हतं.
‘अनफ्रीडम’ची कथा नेमकी काय?
‘अनफ्रीडम’ चित्रपटात दहशतवाद, धार्मिक कट्टरता, समलैंगिक संबंध आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारखे मुद्दे दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाची कथा वेगवेगळ्या पात्रांचे आयुष्य आणि त्यांच्या संघर्षाभोवती फिरते.
राज अमित कुमार दिग्दर्शित ‘अनफ्रीडम’मध्ये व्हिक्टर बॅनर्जी, आदिल हुसैन, प्रीती गुप्ता आणि भावना पाणी हे कलाकार होते. चित्रपटात एका बाजूला दहशतवाद आणि धार्मिक कट्टरता दाखवण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रेम, नातेसंबंध आणि स्वतःच्या ओळखीसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांचे आयुष्य दाखवले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वतःच्या आवडीनुसार जगण्याच्या स्वातंत्र्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
CBFC ने अनफ्रीडमच्या प्रदर्शनावर का आणली बंदी?
चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाकडे (CBFC) पाठवण्यात आला होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील अनेक भागांवर आक्षेप घेतला आणि अनेक बदल सुचवले. मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी हे बदल करण्यास नकार दिला. त्यांच्या मते, हे बदल केल्यानंतर चित्रपटाची मूळ कथा आणि त्याचा अपेक्षित प्रभाव पडणार नाही. यानंतर चित्रपटाच्या टीमने सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरोधात अपीलही केले, पण तरीही चित्रपटाला भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी मिळू शकली नाही.
‘अनफ्रीडम’मध्ये समलैंगिक संबंध आणि लैंगिकता उघडपणे दाखवली गेली होती. चित्रपटात काही इंटिमेंट सीन होते. तसेच दहशतवाद आणि धार्मिक कट्टरतेसारख्या संवेदनशील मुद्द्यांवरही सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. यामुळेच भारतात हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.
परदेशात प्रदर्शित झालेला अनफ्रीडम, ओटीटीवरही आहे पण…
अखेर ‘अनफ्रीडम’ परदेशात प्रदर्शित करण्यात आला. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्याचे स्क्रिनिंग झाले आणि संवेदनशील विषयांवरील सादरीकरणामुळे चित्रपटाचं प्रचंड कौतुक झालं होतं. अनफ्रीडम हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे, पण मात्र प्रादेशिक निर्बंधांमुळे तो ठराविक देशांमध्येच पाहता येतो.
