Bollywood Films That Were Renamed Before Release : बऱ्याचदा चित्रपट बनवणं जितकं आव्हानात्मक असतं तितकंच त्याचं नाव काय असेल हे ठरवणं, हा निर्णय घेणं कठीण असतं. आतापर्यंत अनेक वेळा काही चित्रपट त्यांच्या नावांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट. त्याव्यतिरिक्तसुद्धा बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांची नावं रिलीजपूर्वी बदलण्यात आलेली.
काही चित्रपटांची नावं विषयाला धरून असतात, काहींची ‘एकदम हटके’ असतात, तर काही चित्रपटांच्या नावातच खरी गंमत असते. परंतु, चित्रपटांच्या नावांवरून काही वेळा चित्रपटाला समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून विरोध करण्यात आला आहे. काही वेळेला राजकीय, कधी सामाजिक अशा दबावांमुळेसुद्धा बऱ्याचदा निर्मात्यांना चित्रपटांची नावं बदलावी लागली आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला बॉलीवूडमधील अशा काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यांची नावं रिलीजपूर्वी बदलण्यात आलेली.
‘या’ चित्रपटांची बदलली नावं
गोलियों की रासलीला राम-लीला : दीपिका पादुकोण व रणवीर सिंह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या गोलियों की रासलीला राम-लीला या चित्रपटाचं नाव चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बदलण्यात आलं होतं. चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचं नाव आधी फक्त ‘राम लीला’ ठेवलेलं. परंतु, काही धार्मिक संघटनांनी या नावाचा चुकीच्या पद्धतीनं वापर केला जात आहे, अशी तक्रार केल्यानंतर चित्रपटाचं ‘राम लीला’ हे नाव बदलून ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ असं करण्यात आलं.
बिल्लू – शाहरुख खान व दिवंगत अभिनेता इरफान खान यांच्या या चित्रपटाचं नाव आधी ‘बिल्लू बार्बर’ असं होतं. परंतु, याही चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर ‘बिल्लू बार्बर’वरून फक्त ‘बिल्लू’, असं चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं.
सिंग इज किंग – अक्षय कुमार व कतरिना कैफ यांच्या या चित्रपटाचं नाव आधी ‘राजकुमार’ असं होतं. परंतु, मेकर्सना राजकुमार या नावापेक्षा सिंग इज किंग’श हे नाव अधिक दमदार वाटलं आणि त्यामुळे या चित्रपटाचं नाव बदलण्यात आलं.
आर राजकुमार : शाहिद कपूर व सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचे नाव आधी ‘रॅम्बो राजकुमार’ असं होतं. परंतु, हॉलीवूडच्या लोकप्रिय रॅम्बो या सीरिजच्या मेकर्सनी या नावावर आक्षेप घेतला. त्याशिवाय नावाचे हक्कसुद्धा त्यांच्याकडे असल्यामुळे कायद्यानुसार चित्रपटाचं नाव बदलून ‘रॅम्बो राजकुमार’वरून ‘आर राजकुमार’ असं करण्यात आलं.
मद्रास कॅफे – जॉन अब्राहम याच्या या चित्रपटाचं नाव पूर्वी ‘जाफना’ असं होतं. परंतु, श्रीलंकेतील एका लोकप्रिय शहराचं जाफना हे नाव असल्यामुळे त्या शहराचं नाव खराब होऊ शकतं, असं म्हणत आक्षेप घेतल्यानंतर वाद वाढू नये म्हणून मेकर्सनी चित्रपटाचं नाव बदलून ‘मद्रास कॅफे’, असं केलं.
कल हो ना हो – शाहरुख खान, सैफ अली खान व प्रीती झिंटा यांच्या या सुपरहिट चित्रपटाचे नाव आधी कभी अलविदा ना कहना, असं होतं. पण, एका वेगळ्याच कलाकृतीला हे नाव देण्यात आल्यानंतर चित्रपटाचं कभी अलविदा ना कहना हे नाव बदलून ‘कल हो ना हो’ असं नाव ठेवण्यात आलं.
वीर-झारा : यशराज चोप्रा यांचा लोकप्रिय ‘वीर-झारा’ चित्रपटाचं नाव आधी ये कहा आ गये हम, असं असल्याचं म्हटलं जातं. परंतु, नंतर मेकर्सला पात्रांच्या नावावरून चित्रपटाचं नाव ठेवलं, तर ते अधिक प्रभावशाली होईल असं वाटलं आणि म्हणून त्यांनी ‘वीर-झारा’ असं चित्रपटाचं नाव ठेवलं, ज्याचा सकारात्मक प्रतिसाद त्यांना मिळाला.
लव यात्री : सलमान खानच्या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या चित्रपटाचे नाव आधी ‘लव रात्री’ असं होतं. परंतु, काही हिंदू संघटनांनी नवरात्री या सणाच्या नावाचा चुकीचा वापर होत असल्याचं म्हणत आक्षेप घेतला आणि हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. त्यामुळे चित्रपट अजून जास्त वादाच्या भोवऱ्यात अडकू नये म्हणून मेकर्सनी लव रात्री हे नाव बदलून ‘लव यात्री’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला.
