इराणवर अमेरिकेने इस्रायलसह संयुक्त कारवाई करत क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. तसंच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनाही अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाईत ठार केलं आहे. दरम्यान मध्य आशियात युद्धजन्य स्थिती आहे. अशात बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता या सगळ्या धुमश्चक्रीत अडकली आहे. तिने इन्स्टाग्राम पोस्ट लिहून परिस्थितीची माहिती दिली आहे.

अभिनेत्री इशा गुप्ताने इन्स्टाग्रामवर काय पोस्ट लिहिली आहे?

इशा गुप्ताने पोस्टमध्ये म्हटलं आहे की जे माझ्याशी सोशल मीडियावरुन संवाद साधतात आणि माझ्याबाबत ज्यांना जाणून घेण्याची इच्छा असते अशा सगळ्यांची मी माफी मागते. मी माझ्या चाहत्यांना कुठलाही रिप्लाय देऊ शकले नाही. मी आणि माझ्यासमवेत असलेले सदस्य सुखरुप आहेत.पण या ठिकाणी असलेली परिस्थिती भीतीदायक आणि कठीण आहे. देवाकडे मी प्रार्थना करते की देवाने आमचं रक्षण करावं. या आशयाची पोस्ट इशा गुप्ताने लिहिली आहे. इशाने पुढे म्हटलं आहे की आम्हाला युएईच्या संरक्षण मंत्रालयावर आणि त्यांच्या मदत तसंच बचाव कार्यालय यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी जे लोक अडकून पडले आहेत ते सुरक्षित रहावेत म्हणून मी प्रार्थना करते. मला आशा आहे की मी लवकरच घरी पोहचेन. असं इशाने तिच्या इन्साग्राम अकाऊंवटर अॅड केलेल्या स्टेटसमध्ये म्हटलं आहे.

इशा गुप्ता बहुतेक अबू धाबी या ठिकाणी

इशा गुप्ता सध्या UAE मध्ये आहे. तिच्या पोस्टमध्ये तिने ती नेमकी कुठे आहे हे सांगितलेलं नाही. पण तिने दुसऱ्या एका पोस्टमध्ये अबू धाबी असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ती कदाचित अबू धाबी या ठिकाणी आहे असा अंदाज चाहते लावत आहेत. इशा गुप्ता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटात तिने जी भूमिका केली होती त्याचं चांगलंच कौतुक झालं होतं. तसंच इशाने बॉबी देओलच्या आश्रम या वेब सीरिजमध्येही काम केलं होतं.