आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने ८० च्या दशकात आपल्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली आणि ९० च्या दशकापर्यंत ती बॉलीवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री झाली. तिचे सौंदर्य, उत्तम अभिनयावर लाखो चाहते फिदा होते. पण या अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये शिखरावर असताना लग्न करून कोट्यवधी चाहत्यांना धक्का दिला होता. ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही बॉलीवूडमधील सध्याच्या घडीची सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. तिचं नाव जुही चावला आहे. विशेष म्हणजे, जुहीने आपल्या लग्नाची गोष्ट बऱ्याच काळापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवली होती. चला जाणून घेऊया की, भारतातील या सर्वात श्रीमंत अभिनेत्रीने असं का केलं होतं?

जुही चावलाने १९८६ मध्ये आलेल्या ‘सल्तनत’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर १९८८ मध्ये आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार बनली. ९० च्या दशकापर्यंत तिची गणना बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होऊ लागली होती. त्या काळातील जवळपास प्रत्येक मोठ्या सुपरस्टारबरोबर काम केलेल्या जुहीने, बॉलीवूडमधील देखण्या अभिनेत्यांना सोडून १९९५ मध्ये उद्योगपती जय मेहता यांच्याशी लग्न केलं. जय मेहता तिच्यापेक्षा ७ वर्षांनी मोठे आहेत.

…म्हणून जुही चावलाने लपवले होते लग्न

जुहीने यशाच्या शिखरावर असताना लग्न केलं होतं. त्यामुळे लग्नाबद्दल सर्वांना समजलं तर आपल्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती जुहीला वाटत होती. लग्न झाल्यामुळे आपल्याला चित्रपट मिळण्यात अडचणी येतील आणि करिअर संपून जाईल, अशी भीती तिला होती. २०२० मध्ये राजीव मसंद यांना दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती, “त्या काळात मी इंडस्ट्रीत नुकतीच स्वतःची ओळख निर्माण केली होती आणि खूप चांगलं काम करत होतं. नेमके तेव्हाच जय माझ्या आयुष्यात आले. मला भीती होती की माझं करिअर संपेल. मला माझं कामही सुरू ठेवायचं होतं, त्यामुळे लग्नाची गोष्ट लपवून ठेवणं हा मला मधला मार्ग वाटला.”

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे जुही चावला

जूही चावला बऱ्याच काळापासून अभिनयापासून दूर आहे, तरीही ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. ‘हुरुन रिच लिस्ट’च्या अहवालानुसार, तिची एकूण संपत्ती तब्बल ७,७९० कोटी रुपये आहे. आयपीएलमधील ‘कोलकाता नाईट रायडर्स’ (KKR) या टीमची ती सहमालक आहे, ज्यातून तिची मोठी कमाई होते.